टॉप स्टोरी थर्ड अंपायर

‘दादा’ पर्मनंट नॉट रिचेबल

दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी ठरली. ​त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हरपले आहे. “दादा” या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी ‘दादा’गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही नियतीने केलेली क्रूर थट्टा ठरली आहे. महाराष्ट्रासाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे.

विकासाचा ध्यास आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे दादांनी जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. दादांचा अनेकांना प्रचंड आधार होता, तो आधार निसटल्यामुळे सर्वांनाच प्रचंड मानसिक वेदना होत आहे.​ महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात काही चेहरे असे होते, ज्यांच्याशी मतभेद असले तरी मनभेद कधीच निर्माण झाले नाहीत. विचारांची लढाई होती, मात्र व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर सर्वपक्षीय होता. दुर्दैवाने, अशी उंची गाठलेली माणसं नियतीने वारंवार आपल्यातून हिरावून नेली.

वायएसआर राजशेखर रेड्डी, माधवराव शिंदे, राजेश पायलट, बालयोगी, दोरजी खंडू असे दिग्गज नेते यापूर्वी विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस हे सहा वेळा त्यांच्या हेलिकॉप्टर मधून जाताना अपघातग्रस्त होता होता वाचलेले आहेत. संजय गांधी आणि माधवराव शिंदे यांचा अपवाद वगळता जे काही व्हीआयपी अपघात आहे ते शक्यतो हेलिकॉप्टर मधून घडलेले अपघात आहेत. कारण विमानापेक्षा हेलिकॉप्टरला अपघाताची संभावना टेक्निकली जास्त असते असे त्या क्षेत्रातले कुठलेही तज्ञ सांगतील.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. आबा हे सारे राजकारणात अजून बरंच देऊ शकणारे नेते होते. अनुभव परिपक्वतेच्या टप्प्यावर येत असतानाच काळाने त्यांची वाट अडवली. जनतेच्या आशा, कार्यकर्त्यांची स्वप्नं आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा अपूर्णच राहिल्या. अजितदादांचं जाणंही याच मालिकेतील आणखी एक धक्का ठरलं. दीर्घ संघर्षातून घडलेलं नेतृत्व अचानक थांबतं, तेव्हा केवळ व्यक्ती जात नाही, तर एक संपूर्ण काळ संपतो. डॉ. श्रीकांत जिचकार यांसारखी असामान्य बुद्धिमत्ता आणि निष्ठावंत नेतृत्वही काळाच्या ओघात हरपलं. हे सारं पाहताना अंतर्मुख करणारी शंका मनात उगम पावते की, महाराष्ट्राच्या राजकारणाला अशी अपरिहार्य किंमत मोजावीच लागते आहे का?

राजकारणात अनेकदा अजितदादा पवार नाराज झाल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये कायम एक बातमी येत असायची की, ‘दादा नॉट रिचेबल’. पण दादा ‘परमनंट नॉटरिचेबल’ होतील असे कधीच वाटले नव्हते. दादांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला धक्का देणारी तर ठरलीच, पण शरद पवार यांच्यासारख्या वटवृक्षाला इतकं खचलेलं आजवर कधीच कुणी बघितलेलं नव्हतं. कातरलेले शब्द, पाणावलेले डोळे, घोगरा आवाज, भावनांना बांध घालण्याचा अयशस्वी प्रयत्न महाराष्ट्र पाहत होता. दादांच्या धक्कादायक निधनानंतर माध्यमांसमोर खचलेले कुटुंबप्रमुख शरद पवार यांना बघतांना पाहून कुटुंबावरील आघाताची कल्पना येते. मरणाच्या अखेरीपर्यंत दादांजवळ असलेले लोकांचे ढीगभर अर्ज रक्ताने माखले होते. अनेक अर्ज त्यांच्या मरणाच्या शेजारी खच होऊन पडले होते. हीच त्यांच्या कामाची साक्ष ठरली. अजितदादासारखा मनाला भावणारा, कामाचा माणूस, दूरदृष्टी राजकारणी पुन्हा होणे नाही!

 

मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो.
आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. आज शब्दही थबकले आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक तेजस्वी पर्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्राचाे ‘दादा’ आज आपल्यातून निघून गेले. सामान्य माणसाच्या कणखर नेतृत्वाचा आधारवड कोसळला आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी उघडी दारे, संवेदनशील मन आणि ठाम निर्णयक्षमता असलेले नेतृत्व हरपले आहे. सर्वांसाठी ते फक्त नेते नव्हते, तर आधार, विश्वास आणि प्रेरणा होते. दादांनी आयुष्यभर धावपळ केली. त्यांच्यासोबत सगळ्यांना धावायला लावायचे ते ही एकदम पट्टीत. पत्रकार बातम्या करायचे, दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापलं. काम पुन्हा करायला सांगितलं. काम म्हणलं की त्यांच्यात जोम असायचा. दादांना भेटलं की काम होतंय हा मंत्रालयातला एक अलिखित नियम. म्हणूनच मुख्यमंत्र्यांइतकाच गजबजाट दादांच्या ऑफिसला असायचा. कागद हातात आलाय आणि त्याचं उत्तर दादांकडे नाही असं कधी झालं नाही. कामाची त्यांची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात.‌ दादा एखाद्या दौऱ्याला गेलेत आणि त्यांना एखादं मजेशीर कॅरेक्टर भेटलं नाही असं झालं नाही. कुणीतरी खालून भाषण सुरू असताना ‘आय लव्ह यु दादा’ म्हणावं आणि दादांनी म्हणावं ‘अरे बायकोला म्हण लव्ह यु लव्ह यु’. कार्यक्रमात कुणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा. दादांनी त्यावरून विनोद करावा. फडणवीस-शिंदे आणि दादा सोबत असताना शिंदेंनी काहीतरी बोलावं आणि दादांनी ‘हमारा फिक्स है हम जा रहे है’ ‘अजून विसरले नाहीत’ असे पंच टाकावेत.

सगळे लोटपोट व्हावेत. कुठेतरी गाडी थांबवावी मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटावं काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किस्यांचाच एखादा खंड होईल. राजकारणात काही तडजोडी झाल्या तरी कुटुंब म्हणून त्यांची आपुलकी कायम राहिली. बाहेरच्यांना कुटुंबात जास्त घुसू दिलं नाही.

राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे तंत्र त्यांनी कसोशीने पाळलं. त्यामुळं पक्ष फुटीनंतर सुद्धा अनेक जिव्हाळ्याचे क्षण आपण पाहिले. राजकीय भूमिकांमुळे काही आरोपांमुळे त्यांच्यावर टीकाही झाल्या. मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचं व्हिजन क्लिअर होतं, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. विरोधक सुद्धा ज्यांची स्तुती करतात. कारण ते अजातशत्रू दादा होते. आपला मोठा माणूस हरवला. महाराष्ट्राला पोरके करून निघून गेला. प्रेरणादायी असणारा बोलीचा स्पर्श आणि रांगडी भाषाशैली, कृषी, सहकार आणि ग्रामीण प्रश्नांचे खोलीचे अभ्यासक, उत्तम प्रशासक, लोकाभिमुख नेतृत्व, सत्ता गेल्यानंतर हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे थांबवलेली विकास कामे, पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळण्यासाठी ‘मला राजकीय तडजोड करावी लागली’ असे जाहीरपणे सांगणारे ते परखड वक्ते होते. शब्दाचा पक्का, कामात वाघ, महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पर्वाचा अकाली अस्त कुणाच्याही पचनी पडायला तयार नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, प्रशासनावर जरब असणारे कणखर नेतृत्व आणि जनसामान्यांचे लाडके ‘दादा’ गेल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी ठरली. पहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करणारा हा ‘लोकाभिमुख’ नेता शांत झाला. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दादांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. सडेतोड बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव अजरामर राहील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे.

शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि अहोरात्र कष्ट करण्याची त्यांची वृत्ती सर्वांसाठी कायम प्रेरणादायी होती. राज्याच्या विकासातील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडं पाडलं. व्हिजन पाहिजे तर दादांसारखा नेता पाहिजे, दादांनी केलेली अनेक कामं सांगता येतील, शिवाय कुणाचंही काम असो ते बेष्ट झालं पाहिजे, यासाठी आग्रही असणारा हा व्हिजनरी नेता होता.

जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता होता. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता होता. असे नेते फार कमी घडतात, अर्थात दादा घडण्यामागे शरद पवार आहेत; मात्र यात त्यांची मेहनत, अभ्यास, सातत्य आणि लोकांची जुळलेली नाळ या गोष्टी दादांना ‘दादा’ बनवून जातात. दादांची तुलना शरद पवारांशी व्हायची; मात्र त्यांनी स्वतःला तिकडं नेलं नाही, ते स्वतः भन्नाट होते. दादांच्या बातम्या बघणारी कित्येक लोकं भावुक झालीत, पवार फॅमिली आणि दादांवर प्रेम करणारी माणसं यातून कशी सावरतील हा प्रश्नच आहे. धक्के देण्यात दादा माहीर होते, मात्र एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं.

आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येतंय, दादा बजेट मांडताना दिसले असते, काही शेर आले असते, काही टोलेबाजी झाली असती, मजा आली असती. अजातशत्रू नेता गेल्यामुळे दादांची धावपळ थांबली; पण महाराष्ट्र सुन्न झालाय!


LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *