मशाल पेटली पण मित्रच होरपळला? चंद्रपुरात ठाकरेंनी ‘हात’ झटकल्याने काँग्रेसचा बदला घेण्याचा पवित्रा!
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीने महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आणला असून, आता काँग्रेसने शिवसेना (उबाठा) गटाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. “जर चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देऊन काँग्रेसचा घात केला असेल, तर परभणीत आम्ही तरी का गप्प बसायचे?” असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आघाडीत उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. इंडिया आघाडीचे घटक असतानाही शिवसेनेने भाजपच्या गळ्यात गळा घातल्याने काँग्रेसचे ३१ नगरसेवक असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. “मित्रधर्माला पायदळी तुडवणाऱ्या या निर्णयाचे परिणाम केवळ विदर्भातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील,” असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला. विशेषतः परभणीच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आता शिवसेनेला धडा शिकवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
एमआयएम आणि वंचितवरही तोफ
या पराभवासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीलाही जबाबदार धरले आहे. एमआयएमने मतदानात तटस्थ राहून भाजपचा मार्ग सुकर केला, तर वंचितचे नगरसेवक ऐनवेळी गैरहजर राहिल्याने काँग्रेसचे संख्याबळ घटले. “भाजप आणि एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अंजनगाव सुर्जीनंतर आता चंद्रपुरातही सिद्ध झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली. अवघ्या एका मताने भाजपचा महापौर निवडून येणे ही लोकशाहीची चेष्टा असल्याचेही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार-धानोरकरांची एकजूट तरीही ‘बाहेरून’ वार
काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे हा पराभव झाल्याच्या चर्चांचा सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोन्ही नेत्यांनी विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली होती, मात्र मित्रपक्षांनी ऐनवेळी दगाबाजी केल्यानेच पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण ‘राजकीय फसवणुकीचा’ सविस्तर अहवाल लवकरच पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार असून, त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेसचा पुढील प्रवास कोणत्या दिशेने असेल, हे स्पष्ट होणार आहे.
—
Deepak Kaitke




