महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना मधून प्रकाशित होणार आहे. त्या मुलाखतीला प्रत्युत्तर म्हणून नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकट मुलाखत देणार आहेत.
सत्तरच्या दशकातील मराठी चित्रपटांमध्ये विशेषता तमाशापटांमध्ये सवाल-जबाबांची जुगलबंदी पाहायला मिळायची. अजूनही शक्ती-तुर्यांचा सामना प्रकार मराठी जणांमध्ये आवडीने पाहिला जातो. अगदी त्याप्रमाणेच ठाकरे बंधूंची टीका त्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर आणि टीकेवर प्रति टीका असा सवाल-जबाबांचा सामना प्रसार माध्यमांमध्ये येत्या दोन-तीन दिवसात जबरदस्त रंगणार आहे.
ठाकरे बंधूंच्या टीकेच्या सवालावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर भारी पडणार की ठाकरे बंधू या सामन्यामध्ये बाजी मारणार. मूळ प्रश्नांना बगल देऊन तिसरा विषय मध्ये आणून कोण आपला अजेंडा पुढे रेटणार आणि कोण कुणाला खिंडीत गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जनसामान्यांचे प्रश्न बेरोजगारी, वाढती महागाई, महानगरांमधील प्रदूषणाची समस्या यावरही बोलले जाणार आणि काही उपाययोजना होणार की फक्त आरोपांची राळ उडवत एकमेकांवर चिखलफेक होणार, हे येत्या दोन-तीन दिवसात समजेलच.
gajanantupe2@gmail.com




