टॉप स्टोरी महाराष्ट्र

डोंबिवलीतील त्या राड्याचा हिशोब चुकता? शिंदेंच्या शिलेदारांना आता थेट कोठडीचीच हवा खावी लागणार?

विशेष प्रतिनिधी:वरिष्ठ पातळीवर महायुतीचे ‘फेविकोल’ कितीही घट्ट असल्याचा दावा केला जात असला, तरी डोंबिवलीच्या जमिनीवर मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षाची ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेला तो भीषण राडा आणि भाजप पदाधिकाऱ्यावर झालेला हल्ला आता थेट शिवसेनेच्या दोन बड्या माजी नगरसेवकांच्या मुळावर आला असून, न्यायालयाने दिलेल्या एका दणकेबाज निर्णयाने राजकीय वर्तुळाची झोप उडवली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक २९ मधील तुकाराम नगर परिसर रणांगण बनला होता. पैसे वाटपाच्या संशयावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या हाणामारीत भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि इथूनच ‘पाटील बंधूं’च्या अडचणींना सुरुवात झाली. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह ७ जणांच्या मुसक्या आवळल्या खऱ्या, पण नाट्यमय घडामोडी तिथेच थांबल्या नाहीत.

अटकेच्या दिवशीच प्रकृती खालावल्याचे सांगत हे दोन्ही नेते रुग्णालयात दाखल झाले. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना दिलासा मिळेल असे वाटत होते, मात्र डिस्चार्ज मिळताच नियतीने पुन्हा वळण घेतले. पोलिसांनी त्यांना थेट उचलून कल्याण न्यायालयात उभे केले. न्यायाधीशांसमोर जामिनासाठी युक्तिवाद सुरू असतानाच, न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत असा काही निकाल दिला की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

न्यायालयाने दोन्ही पाटील बंधूंना ७ फेब्रुवारीपर्यंत थेट न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. जामिनासाठी दिलेला अर्जही न्यायालयाने तातडीने न विचारात घेता पुढील सुनावणीसाठी प्रलंबित ठेवला आहे. आता पुढचे तीन दिवस या माजी नगरसेवकांना तुरुंगाची वारी करावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. पण खरा प्रश्न हा आहे की, ७ फेब्रुवारीला त्यांना जामीन मिळणार की या कोठडीच्या मुदतीत आणखी वाढ होऊन महायुतीमधील हा ‘मैत्रीपूर्ण’ संघर्ष अधिक उग्र रूप धारण करणार? या निकालाने आता डोंबिवलीत शिवसेना-भाजप वादाचा ‘दुसरा अंक’ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *