अमरावतीच्या आरोग्याला ‘बुस्टर डोस’ मिळणार; ४३० खाटांच्या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी सरकारने नक्की कोणती जागा निवडली?
मुंबई प्रतिनिधी :अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील आरोग्य सेवेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागेचा तिढा सुटला आहे. पण हे कॉलेज आणि भव्य रुग्णालय नक्की कुठे उभे राहणार, याची उत्सुकता तुम्हालाही असेलच!
नेमकी जागा कोणती?
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहराजवळील आलियाबाद येथील तब्बल ११.२९ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने या जमिनीचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्यास बुधवारी अधिकृत मंजुरी दिली आहे.
काय काय असणार या संकुलात?
या जागेवर १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. इतकेच नाही, तर या महाविद्यालयाला संलग्न असे ४३० खाटांचे (Beds) सुसज्ज रुग्णालय देखील येथे सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अमरावतीच्या आरोग्य नकाशात मोठा बदल घडणार आहे.
सरकारच्या अटी काय?
जमीन देताना शासनाने काही कडक अटी घातल्या आहेत. ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या तत्त्वावर विनामूल्य देण्यात आली असली, तरी ती कोणालाही विकता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही किंवा महसूल विभागाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत या नियोजित प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंत्र्यांची प्रतिक्रिया
“आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून सरकार काम करत आहे. या निर्णयामुळे अमरावतीसह संपूर्ण पश्चिम विदर्भातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल,” असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
—
Deepak Kaitke




