महिला सन्मानाचा प्रश्न की सत्तेतील अंतर्गत राजकारण? शिंदे गट अडचणीत
मुंबई: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या स्वागत बॅनरमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो मुद्दाम लहान आकारात लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर नेत्यांचे फोटो ठळक, मोठ्या आणि मध्यवर्ती स्वरूपात झळकत असताना, घटनात्मक पदावर असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो मात्र तुलनेने अत्यंत लहान ठेवण्यात आला आहे. ही बाब केवळ तांत्रिक चूक की जाणीवपूर्वक केलेली राजकीय चाल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याआधीही काही निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता थेट बॅनरच्या माध्यमातूनच राजकीय संदेश देण्यात आला आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. “हा प्रकार केवळ फोटोचा नाही, तर एका महिलेला आणि घटनात्मक पदालाच कमी लेखण्याचा आहे. सत्ताधाऱ्यांची ही मानसिकता अत्यंत घातक असून याचा तीव्र निषेध व्हायला हवा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया देत महिला सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला आहे. “हा केवळ राजकीय मतभेदांचा विषय नाही, तर महिलांकडे पाहण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनाचा आरसा आहे. एका महिलेला जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देणे ही बाब महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणाला आता केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक स्वरूपही प्राप्त झाले आहे. महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्तरांतून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “घटनात्मक पदावर असलेल्या महिलेला अशा प्रकारे कमी लेखणे अयोग्य आहे,” असा एकसूर प्रतिक्रिया येत आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना, दुसरीकडे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद, सन्मानाचा प्रश्न आणि वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर येताना दिसत आहे.
हा वाद केवळ बॅनरपुरता मर्यादित राहणार की सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




