मुंबई, दि.२१। प्रतिनिधी जपान सरकारच्या निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपानला दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर या दरम्यान स्वाक्षऱ्या होतील. दोन्ही देशांच्या सहकार्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या संदर्भात जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. जपान दौऱ्यात ते विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. त्यात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह इतर महत्वाच्या मंडळींचा समावेश आहे. फडणवीसांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.