टॉप स्टोरी राजकारण

अमित शहांचा ‘तो’ एक निगेटिव्ह शेरा आणि अजितदादांच्या परतीचा प्रवास; घातपाताच्या चर्चेमागे ‘जरंडेश्वर’ची फाईल?

विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलण्याऐवजी ते दिवसागणिक अधिकच गडद होत चालले आहे. आता या प्रकरणात एका अत्यंत महत्त्वाच्या ‘फाईल’चा प्रवेश झाला असून, ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यावरून थेट खळबळजनक दावा केला आहे. ज्या कारणासाठी अजित पवार भाजपसोबत गेले, ते कारणच संपुष्टात आल्याने त्यांनी पुन्हा मागे फिरण्याचा विचार सुरू केला होता का? आणि याच विचारातून या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली का? असे अस्वस्थ करणारे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

नेमकं काय होतं त्या फाईलमध्ये?

संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ‘जरंडेश्वर’ साखर कारखान्याच्या कर्जाशी संबंधित आहे. अजित पवार भाजपमध्ये सामील होण्यामागे काही फाईल्स बंद व्हाव्यात, हा एक मुख्य उद्देश होता. त्यानुसार, जरंडेश्वर कारखान्याशी संबंधित फाईल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे बंद करण्यासाठी पाठवण्यात आली होती. मात्र, तिथेच खरा ‘खेळ’ झाला. अमित शहा यांनी ही फाईल बंद करण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यावर ‘निगेटिव्ह शेरा’ मारून ती पुन्हा महाराष्ट्रात पाठवली.

भाजप मंत्र्यांचा दबाव आणि दादांचा ‘यू-टर्न’

अमित शहांचा नकारात्मक शेरा आल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप मंत्र्यांनी अजित पवारांना “तुमची फाईल अजून बंद झालेली नाही, ती आमच्याकडेच आहे,” असे सुनावण्यास सुरुवात केली होती, असा दावा राऊतांनी केला आहे. ज्या कारणासाठी त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली, तेच साध्य होत नसल्याचे पाहून अजितदादा व्यथित झाले होते. “मग दादांनी पुन्हा मागे फिरण्याबाबत पुनर्विचार सुरू केला आणि तिथूनच या संशयास्पद घडामोडींची साखळी सुरू झाली,” असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

अपघात की नियोजित कट?

जरंडेश्वर कारखान्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती आणि ती फाईल अचानक पुन्हा उघडली जाणे, हे केवळ योगायोग होते की काही वेगळे? संजय राऊत यांच्या मते, या फाईलवरील शेरे तपासल्यास बरेच सत्य बाहेर येऊ शकते. ज्यावेळी अजित पवारांनी भाजपची साथ सोडण्याबाबत हालचाली सुरू केल्या, त्याच काळात हा विमान अपघात होणे, यामुळे या प्रकरणाला आता राजकीय कटाचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.

अमित शहांचा तो ‘एक शेरा’ अजित पवारांच्या राजकीय प्रवासाचा आणि आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला का? या प्रश्नाचे उत्तर आता संपूर्ण महाराष्ट्र शोधत आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *