राजकारण

मुद्द्यांची निवडणूक गुद्द्यांवर; आता हत्या सुरू—स्थानिक स्वराज्य निवडणुकांत महाराष्ट्र धोकादायक वळणावर

विशेष प्रतिनिधी :एकेकाळी बिहार आणि उत्तर भारतातील रक्तरंजित निवडणुकांचा संदर्भ देत महाराष्ट्र स्वतःला लोकशाहीदृष्ट्या परिपक्व राज्य मानत होता. मात्र अलीकडच्या काळात महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट हल्ले, गोळीबार आणि हत्या घडत असल्याने ही प्रतिमा झपाट्याने बदलते आहे.मुद्द्यांवर लढल्या जाणाऱ्या निवडणुका आता गुद्द्यांवर आल्या असून काही ठिकाणी त्या थेट रक्तपातापर्यंत पोहोचल्या आहेत, हे वास्तव गंभीर राजकीय इशारा देणारे आहे.

सोलापूर : मनसे पदाधिकाऱ्याची हत्या, भाजपाशी संबंधित वादातून संघर्ष

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या तणावातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
तक्रारीनुसार, हा वाद एवढा वाढला की संबंधित उमेदवारीच्या हत्येच्या या प्रकरणात शालन शिंदे, शंकर शिंदे, सुनील शिंदे आणि आलोक शिंदे यांची नावे आरोपी म्हणून समोर आली असून पोलिसांनी अटक केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया देत राजकीय वातावरण तापवले.

आकोला : काँग्रेस नेत्याची चाकूहल्ल्यात हत्या

आकोला जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांच्या काळात चे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची चाकूहल्ल्यात हत्या झाली.
या प्रकरणात उबेद पटेल याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

धुळे : अर्ज माघारीच्या वादातून गोळीबार

धुळे शहरात महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली.
या प्रकरणात भाजप समर्थक गट आणि विरोधी गट आमनेसामने आले असल्याची माहिती आहे. गोळीबारात एका उमेदवाराच्या नातेवाइकासह काही जण जखमी झाले. पोलिसांनी संशयितांची नावे तपासात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएम पक्षाच्या इम्तियाज जलील यांच्या वाहनावर दगडफेक व हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेत जीवितहानी टळली, मात्र राजकीय तणाव अधिक वाढला. या प्रकरणात स्थानिक राजकीय गटांतील कार्यकर्ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

बिहार–उत्तर भारताची आठवण करून देणारे चित्र

पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुका म्हणजे बुथ कॅप्चरिंग, हत्या आणि दहशत अशी प्रतिमा होती. आज महाराष्ट्रात महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत तशीच हिंसा दिसू लागल्याने राजकीय विश्लेषक चिंता व्यक्त करत आहेत. फरक इतकाच की—इथे हिंसा आता शहरांपर्यंत, महानगरपालिकांपर्यंत पोहोचली आहे.

पैसा, सत्ता आणि स्थानिक स्वराज्य

स्थानिक स्वराज्य संस्था आज विकासाचेच नव्हे, तर राजकीय सत्ता, निधी आणि प्रभाव यांचे केंद्र बनल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी, पदे आणि वर्चस्वासाठीची लढाई तीव्र होत आहे.
या संघर्षात पक्षीय मतभेद हातघाईवर येत असून, काही प्रकरणांत कार्यकर्त्यांवर हल्ले आणि नेत्यांच्या हत्या झाल्याचे चित्र समोर आले आहे.

लोकशाहीसमोर गंभीर प्रश्न

स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया मानल्या जातात. मात्र निवडणूक प्रक्रिया जर हिंसेच्या जोरावर वळवली जात असेल, तर लोकशाहीचा आत्माच धोक्यात येतो.
आज महाराष्ट्रासमोर प्रश्न उभा आहे—
आपण बिहार–उत्तर प्रदेशच्या रक्तरंजित निवडणुकांचा मार्ग स्वीकारतोय का, की वेळेत थांबून लोकशाही वाचवणार?

राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण न केल्यास आणि प्रशासनाने कडक पावले उचलली नाहीत, तर मुद्द्यांवरची निवडणूक पुन्हा विचारांवर येण्याऐवजी कायम गुद्द्यांवरच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *