मुंबई प्रतिनिधी:मुंबईतील पुराच्या वेळी दोघे ठाकरे बंधू कुठे होते, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गुरुवारी केला. मुंबईत जेव्हा पूर आला होता तेव्हा कोणी बंगल्यावर होते तर कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. हे दोघे भाऊ पुराच्या वेळी कोणाला दिसले का, अशी विचारणाही त्यांनी केली.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत ठाकरे बंधूंना बोलते केले आहे. या मुलाखतीवरून शेलार यांनी आज ठाकरे बंधूना टीकेचे लक्ष्य केले.
हे सगळे फिल्मी लोक आहेत. दिवसा-रात्री चित्रपट बघायचे, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या. घर-परिवारासोबत फाफडा जिलेबी खायची. यांना मुंबईकरांच्या प्रश्नांविषयी काहीही देणेघेणे नाही. मुंबईकरांसाठी ते कधी रस्त्यावर आले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलार यांनी केली.
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता . ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावरूनही शेलार यांनी राज ठाकरे यांना सुनावले. तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जिंकवू शकले नाहीत. त्यांना लोकांनी घरी बसवले. ज्यांनी घरी बसवले , त्या ठाकरे सेनेसोबत तुम्ही हातमिळवणी केली. पहिले तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवले ते आधी बघा, असा सणसणीत टोला शेलार यांनी लगावला.




