मुंबई, दि.२३। प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र त्यांनी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पाठवले होते. पण शिवसेनेच्या बंडाळीनंतर ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातर्फे किल्ला लढवताना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या या टिकेला ब्रेक लावण्यासाठी त्यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात संजय राऊत येथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड केली जावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर केले जावे.’