मराठी जनता खवळली….. आता यांना चांगलीच अद्दल घडवायची
विशेष प्रतिनिधी:मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे स्थानिक नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला वाटण्याच्या अक्षता लावल्याने खवळलेल्या शिंदेसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वबळावर निवडणूक लढवत असताना हिंदी भाषिकांची मते शिवसेनेकडे यावीत यासाठी उघडपणे “हिंदी” भाषेचा कैवार घेतल्याने येथील मोठ्या संख्येने इतर अल्पसंख्यांक मतदार प्रचंड खवळला आहे.यावेळी येथील मराठीसह भाजप विरोधी एका मोठ्या अल्पसंख्यांच्या समुदायाने यावेळी सरनाईक यांना कायमची अद्दल घडवण्याचा जणू चंगच बांधला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ज्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यात एक एक मोठा मतदारसंघ हा मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मोडतो.२०१७ साली झालेल्या मनपाच्या निवडणुकीत येथे एकत्रित शिवसेनेला अंदाजे २०जागा मिळाल्या होत्या.परंतु नंतरच्या दोनच वर्षात स्थानिक भाजप नेते आ.नरेंद्र मेहता यांनी मूळ शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना विविध प्रकारची अमिषे देत भाजपत ओढून घेतले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ नावापुरता राहिले.
मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतरही शिंदे सेनेच्या नेत्यांना आजही या शहरात आमच्या पक्षाचा दबदबा असल्याचा “गोड गैरसमज” झाल्याने सरनाईक यांनी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी भाजप नेते मेहता यांच्याकडे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जागांची मागणी केल्याने मेहता यांनीही कोणालाही विचारत न घेता थेट सरनाईक यांच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे खवळलेल्या प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण मिरा भाईंदर मनपाच्या उमेदवारांची यादी घोषित करत त्यांच्या प्रचार साहित्य ते त्यांना लागणारी आर्थिक रसद आपल्या खांद्यावर घेतली.
आता सरनाईक यांची वर्णी महायुतीच्या सरकारमध्ये लागल्यापासून त्यांना “स्वर्ग”जणू दोन बोटांवर असल्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी येथील जवळपास ७० टक्के असलेल्या मराठी व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांची सहानुभूती असलेला किमान २० टक्के अल्पसंख्यांक वर्ग मिळून जे उर्वरित २० टक्के बिहार,झारखंड, उत्तरप्रदेश या भाजपच्या परंपरागत मतदारांना शिवसेनेकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून आपण आपल्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत काय कामे केली त्यासंदर्भात एका “हिंदी”पुस्तिकेचे वाटप केले. आठ पानी पुस्तकाच्या किमान २५ लाख प्रति छापून त्याचे वाटप सरनाईक यांनी केल्याचे परिसरात सर्रास बोलले जाते.
पण याही पेक्षा संतापजनक बाब अशी की याच सरनाईक यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या प्रचारात मुंबई”कोणालाही हिरावून देणार नाही, हे राज्य मराठ्यांचे आहे”, असे जे छाती बडवून सांगत आम्हीच कसे खरे मराठीचे कैवारी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रयत्न करीत आहेत त्यांच्याच तोंडात त्यांचे दात घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत हे मात्र निश्चित.




