टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

काशीत बुलडोझर, महाराष्ट्रात संताप!

अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान; ‘हे कसले हिंदुत्व?’ — नाना पटोलेंचा मोदी–योगींवर घणाघात

विशेष प्रतिनिधी:“हिंदुत्वाचे रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच हिंदू अस्मितेवर घाव घातला आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काशीतील पवित्र मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत पटोले यांनी याला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा, तसेच संपूर्ण धनगर समाजाचा अपमान ठरवले आहे.

“विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या श्रद्धास्थानांवर बुलडोझर चालवण्याचा अधिकार मोदी–योगींना कोणी दिला? त्यांनी जाहीर माफी मागावी,” अशी थेट मागणीही पटोलेंनी केली.

‘काशी केवळ शहर नाही, ती हिंदुंची आत्मा आहे’
माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, काशी हे केवळ भौगोलिक शहर नसून हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि मानाचे आध्यात्मिक केंद्र आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीन वेळा निवडून आले. पण काशीच्या विकासाच्या नावाखाली शेकडो मंदिरे तोडली गेली आणि आता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त केला गेला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणाच्या आधारावर राज्य कारभार केला. काशी विश्वनाथ, सोमनाथ यांसारख्या अनेक मंदिरांची त्यांनी पुनर्बांधणी केली. “अशा थोर व्यक्तिमत्त्वाशी निगडित स्थळ उद्ध्वस्त करणे म्हणजे हिंदू धर्माच्या इतिहासावरच हल्ला आहे,” असे पटोले म्हणाले.

‘मोक्षदायी घाटावर बुलडोझर!’

पटोले यांनी मणिकर्णिका घाटाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “या घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदू धर्मातील धारणा आहे. हा घाट ५१ शक्तीपीठांपैकी एक मानला जातो. अशा पवित्र स्थळी बुलडोझर चालवणे हा हिंदू समाजाचा घोर अपमान आहे.”

याहून गंभीर बाब म्हणजे, “काहीच घडले नाही, दाखवले जाणारे दृश्य एआय (AI) आहे,” असा दावा योगी आदित्यनाथ सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत पटोले यांनी संताप व्यक्त केला. “खरं दडपण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.

‘मी उद्या काशीला जाणार’

पटोले यांनी स्पष्ट केले की, होळकर घराण्यातील काही सदस्यांनी स्वतः काशीला जाऊन वस्तुस्थिती तपासली असून सरकारला पत्रही पाठवले आहे. “मी स्वतः उद्या काशीला जाऊन परिस्थिती पाहणार आहे आणि मोदी–योगी सरकारचा प्रत्यक्ष निषेध करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

दावोसवरही निशाणा: ‘इव्हेंटबाजी थांबवा’

याचवेळी पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौर्‍यावरही टीका केली. “दरवर्षी लाखो कोटींच्या गुंतवणूक करारांची घोषणा होते. पण जर इतकी गुंतवणूक प्रत्यक्षात आली असती, तर राज्यात बेरोजगारी वाढली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“राज्य कर्जबाजारी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामांसाठी निधी नसताना मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधींची उधळण करत आहेत,” असा आरोप करत त्यांनी या दौऱ्याला ‘इव्हेंटबाजी’ संबोधले.

राजकीय रण पेटले

काशीतील मणिकर्णिका घाटाच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी केलेला हा हल्ला केवळ धार्मिक नव्हे, तर थेट राजकीय अंगाने धारदार ठरत आहे. अहिल्याबाई होळकर, धनगर समाज, हिंदू अस्मिता आणि विकासाच्या नावाखालील राजकारण — या सगळ्यांचे धागेदोरे जोडत पटोलेंनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारला कठड्यावर उभे केले आहे.

काशीतील बुलडोझरवरून उठलेला हा वाद केवळ आरोप–प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहणार, की तो राष्ट्रीय राजकारणात नवा भडका उडवणार?
उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल, पण या मुद्द्याने राजकीय तापमान मात्र निश्चितच वाढवले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *