भविष्यातील संकटाचा भार पुढच्या पिढीवर कशाला? हवामान बदलाचा प्रश्न ‘नैतिक’ कर्तव्याने सोडवा; पंकजा मुंडेंचे मुंबईतून आवाहन!
विशेष प्रतिनिधी:”हवामान बदल हे केवळ सरकारी धोरणांचे विषय नसून ती आपली सामूहिक नैतिक जबाबदारी आहे. आज आपण अनुभवत असलेले वाढते तापमान आणि अनियमित पाऊस ही धोक्याची घंटा आहे. आपली जबाबदारी आपण आज समजून घेतली, तरच उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित राहील,” असे आग्रही प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबईतील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये आयोजित ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
पर्यावरण हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्याची गरज
पंकजा मुंडे यांनी यावेळी शिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्याची सूचना केली. “पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता, शालेय पातळीवर नागरिकशास्त्राप्रमाणे तो एक स्वतंत्र आणि अनिवार्य विषय म्हणून शिकवला जावा,” असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण झाली, तरच हवामान कृतीला (Climate Action) खरी ताकद मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विकास साधताना निसर्गाचा समतोल राखणे ही जागतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सौरऊर्जा आणि शाश्वत शेतीवर भर: प्रवीण परदेशी
या चर्चासत्रात ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनीही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, शेती क्षेत्रात विकेंद्रित सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे लाखो शेतकरी आता वीज निर्मितीशी जोडले गेले आहेत. वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच विकासाचा खरा मार्ग आहे. याशिवाय, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पीक पद्धतीत हवामानानुसार केलेले बदल हे राज्याच्या शाश्वत विकासासाठी क्रांतिकारी ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तालुकास्तरावर होणार हवामानाचे विश्लेषण
महाराष्ट्राने हवामान कृती आराखड्यात घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक ‘WRI India’ च्या वतीने करण्यात आले. ‘परिवर्तन : एव्हरी तालुका क्लायमेट रेडी’ या उपक्रमामुळे आता राज्यातील प्रत्येक तालुक्याचे हवामान विश्लेषण केले जात आहे. यामुळे केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही हवामान बदलाशी लढण्याची यंत्रणा उभी राहत आहे. या कार्यक्रमाला पर्यावरण सचिव जयश्री भोज आणि अनेक नामवंत तज्ज्ञ उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी यावेळेस स्पष्ट केले की, निसर्गावर केलेले कोणतेही अतिक्रमण हे अखेर संपूर्ण मानवजातीवर परिणाम करते. त्यामुळे हवामान रक्षणासाठी उपलब्ध होणारा निधी केवळ कागदावर खर्च न होता तो प्रत्यक्ष जमिनीवर बदल घडवणारा असावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
—
Deepak Kaitke




