मंत्रालयातील ‘त्या’ लाचखोरीने झिरवाळ संतापले; लिपीकाचा कुणाशी होता संबंध? गोपनीय अहवालानंतर मोठे मासे गळाला लागणार?
विशेष प्रतिनिधी:मंत्रालयातील स्वतःच्याच दालनात झालेल्या लाचखोरीच्या प्रकारामुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “माझ्या दालनात घडलेला हा प्रकार निंदनीय असून हे प्रशासनाला कलंक लावणारे वर्तन आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणाची केवळ चौकशीच नाही, तर एक स्वतंत्र गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले असून, यामुळे मंत्रालयात आता कोणाचे धाबे दणाणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रंगेहाथ पकडल्यानंतर कारवाईचा बडगा
गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या धक्कादायक घटनेनंतर झिरवाळ यांनी तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अहवाल प्राप्त होताच ढेरंगेवर कठोर कारवाई केली जाईल.
“कोणाचाही संबंध आढळला तर खैर नाही!”
मंत्री झिरवाळ यांनी यावेळी केवळ लिपिकालाच नाही, तर त्याच्या मागे असलेल्या ‘अदृश्य’ शक्तींनाही इशारा दिला आहे. “ढेरंगे याच्याशी विभागातील अन्य कोणाचाही संबंध आढळला, तर त्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून, यापुढे विभागाच्या प्रत्येक हालचालीवर स्वतःची ‘बारीक नजर’ असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय षडयंत्राची शक्यता नाकारली
हे प्रकरण कोणी मुद्दाम घडवून आणले आहे का? या प्रश्नावर झिरवाळ यांनी संयमी भूमिका घेतली. “मी कोणाचाही स्पर्धक नाही आणि सर्वच पक्षांसोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध कोणी असे षडयंत्र रचेल असे मला वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी अंतर्गत राजकारणाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मंत्र्यांच्या दालनातच लाच घेण्याचे धाडस लिपिकाने कोणाच्या बळावर केले, याचे उत्तर आता त्या गोपनीय अहवालातून बाहेर येणार का, याची चर्चा मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये रंगू लागली आहे.
—
Deepak Kaitke




