माऊलींनी सद्गुरूंना अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले ! – ह भ प नरहरी महाराज
गुरुमाऊली जयंती महोत्सव
श्री ज्ञानेश्वरी भावकथा: पुष्प पाचवे
—————
अकोट दि.१७:संत ज्ञानेश्वर महाराजांची श्रीगुरुंवरील भक्ती ही केवळ शब्दांची नाही, तर ती ‘अद्वैत भक्ती’ आहे. त्यांनी सद्गुरूंना (निवृत्तीनाथांना) केवळ देह स्वरूपात न पाहता, त्यांना आपल्या अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले.आणि इहलोक व परलोकी देखील सद्गुरूंची आंतरिक सेवा केली ही गुरु शिष्यांची ही परंपरा अलौकीक आहे.अशा आशयाचे चिंतन प्रगट करुन गुरुसेवेची महात्म्य ज्ञानेश्वरी कंठस्थ हरिभक्त परायण श्री नरहरी महाराज सांगळे यांनी विशद केले.
गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०९ व्या जयंती महोत्सवाअंतर्गत श्री ज्ञानेश्वरी भाव कथेचे पाचवे पुष्प गुंफताना श्री नरहरी महाराज बोलत होते.
श्री ज्ञानेश्वरी भाव कथेतील भाविक श्रोत्यांशी संवाद साधतांना नरहरी महाराज आपल्या निरूपणात पुढे म्हणाले माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये (विशेषतः पहिल्या आणि पंधराव्या अध्यायात) आपल्या गुरूंची—श्री निवृत्तीनाथांची—जी स्तुती केली आहे, ती केवळ शब्दांची फुले नसून ती एक भावांजली आहे.
मन, बुद्धी, चित्त आणि अर्ध्य या प्रतीकांचा वापर करून त्यांनी केलेली गुरुपूजा अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
ज्ञानेश्वर महाराज आपली बुद्धी ही एखाद्या कमळासारखी मानतात. तसाच त्यांच्या बुद्धीमध्ये गुरुभक्तीचा गोडवा भरलेला आहे. ते आपली सर्व बुद्धी गुरूंच्या चरणी अर्पण करतात. त्यांच्या मते, माझी प्रज्ञा किंवा बुद्धी जी काही आकलन करते, ती केवळ गुरुकृपेमुळेच. बुद्धीचा अहंकार सोडून ती ‘मधा’सारखी मऊ आणि रसाळ करून त्यांनी गुरूंना अर्पण केली आहे.
भक्तीमध्ये ‘अर्ध्य’ देण्याला (देवाच्या हातावर किंवा पायावर पाणी सोडणे) मोठे महत्त्व आहे.
माऊली म्हणतात की, मी बाहेरील पाण्याची गंगा न आणता, माझे ‘चित्त’ (अंतःकरण/मन) हेच हातामध्ये घेतले आहे.
आपले चंचल चित्त स्थिर करून, ते शुद्ध भावाच्या पाण्याने भरून त्यांनी गुरूंच्या चरणांवर ‘अर्ध्य’ म्हणून अर्पिले आहे. म्हणजेच, “माझे मन आता माझे राहिले नसून ते पूर्णपणे गुरूमय झाले आहे,” हा यामागचा भाव आहे.
ज्ञानेश्वर महाराजांसाठी गुरुपूजा ही केवळ बाह्य उपचार (फूल, गंध, अक्षता) नव्हती, तर ती ‘अद्वैत पूजा’ होती.
त्यांनी आपले ‘स्वत्व’ (स्वतःचे अस्तित्व) विसरून गुरूंशी एकरूप होण्यालाच खरी पूजा मानले.त्यांनी आपल्या अकराही इंद्रियांच्या वृत्तींना एकत्र करून, त्याचा ‘हार’ केला आणि तो श्रीगुरूंच्या गळ्यात घातला.
ज्ञानेश्वर महाराजांनी रक्तामांसाच्या देहाने केलेली पूजा न सांगता, भावाची पूजा सांगितली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या मते, गुरुसेवा ही केवळ बाह्य उपचार नसून ते अंतर्मनाचे समर्पण आहे. त्यांनी केलेल्या मानस पूजेचे स्वरूप अत्यंत व्यापक आहे: सद्गुरू हे बाहेर शोधण्याची वस्तू नसून ते आपल्याच हृदयमंदिरात विराजमान आहेत. जेव्हा ते म्हणतात, “आता हृदयीं धरूनि निवृत्तीदेवो”, तेव्हा ते सुचवतात की शिष्याने आपल्या चैतन्याच्या गाभाऱ्यात गुरूंची मूर्ती प्रतिष्ठित करावी.चंचल असलेल्या मनाला विषयांकडून ओढून सद्गुरूंच्या चरणी स्थिर करणे, हीच खरी मानस पूजा.
आपली तर्कशक्ती आणि सारासार विचार करण्याची क्षमता गुरूंच्या चरणी अर्पण करणे म्हणजे ‘बुद्धीचा अर्ध्य’ देणे होय. जेव्हा बुद्धी गुरूंच्या आज्ञेनुसार चालू लागते, तेव्हा ती शुद्ध होते चित्तामध्ये साठवलेले मी पणा पुसून टाकून, तिथे फक्त गुरुस्मरण ठेवणे म्हणजे चित्त अर्पण करणे. माऊलींनी आपला ‘अहंकार’ गुरूंच्या चरणी वाहिली, ज्यामुळे त्यांना विश्वात्मक देवाचे दर्शन घडले.
शब्दांतून आणि कृतीतून
ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी केलेली गुरुवंदना ही एक प्रकारची वाङ्मयीन मानस पूजाच आहे. त्यांनी आपली प्रतिभा, आपले शब्द आणि आपली साधना सर्वकाही निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केली.
माऊलींच्या दृष्टीने सद्गुरू हेच परमात्मारुप आहेत. जसे सूर्याच्या प्रकाशात वेगळा दिवा लावण्याची गरज नसते, तसेच गुरुभक्तीत स्वतःचे वेगळेपण उरत नाही. मन, बुद्धी आणि चित्त जेव्हा गुरुमय होतात, तेव्हाच ‘मीपण’ विरून जाते आणि शिष्याला स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो.माऊली ज्ञानाचा सागर आहेत.
गुरु असता पाठीराखा… गुरुकृपेमुळेच माउलींना एवढं अलौकिकत्व प्राप्त झाले आहे.
अशा गुरु सेवेने गुरुं प्रसन्न होऊन आपल्या शिष्यांच्या सगळ्या मनोकामना पुर्ण करतात.साधकांनी अशा समर्पण भावनेने गुरुंची पुजा करुन धन्य व्हावे असा उपदेश नरहरी महाराजांनी शेवटी दिला
आपल्या अमृतवाणीतील चिंतनाने भाविक श्रोते तृप्त झाल्याचे दिसून आले
🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दांकन
नंदकिशोर हिंगणकर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




