टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

शपथविधी सुनेत्रा वहिनींचा, पण चर्चा फक्त ‘साहेबांच्या’ गुगलीची?

एकाच पत्रकार परिषदेत सत्तेची सर्व समीकरणं कशी उलथवून लावली?

राजकीय विशेष विश्लेषण | मुंबई:राज्याच्या राजकारणात ‘पटकथा’ कुणीही लिहिली असली, तरी त्यातील ‘ट्विस्ट’ कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार आजही फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे. शनिवारी सकाळी बारामतीत झालेली पवारांची पत्रकार परिषद आणि संध्याकाळी राजभवनावर झालेला शपथविधी या दोन टोकांच्या घटना असल्या तरी, खऱ्या अर्थाने ‘दोरी’ कुणाच्या हाती आहे, हे साहेबांनी जगाला दाखवून दिले आहे. एकाच दगडात अनेक पक्षी गार करण्याची आपली जुनी हतोटी वापरत पवारांनी महायुती आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विचार करायला भाग पाडले आहे.

गौप्यस्फोटाचा ‘धुराळा’ आणि नेत्यांची कोंडी!

​शरद पवारांनी आज सकाळी असा काही ‘बार’ काढला की, त्याचे पडसाद शपथविधी सोहळ्यातही उमटत होते. “१२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, अजितची तशी इच्छा होती,” हे पवारांचे एक वाक्य सध्याच्या सत्ताधारी नेत्यांसाठी ‘चेकमेट’ ठरले आहे. या एका विधानामुळे पवारांनी अनेक गोष्टी साध्य केल्या:
​अजितदादांच्या प्रतिमेचे रक्षण: दादांना पक्षाचे विलीनीकरण हवे होते, हे सांगून त्यांनी दादांच्या मनात काकांविषयी आदर होता हे जनतेला पटवून दिले.
​सध्याच्या नेत्यांवर संशय: दादांच्या निधनानंतर दोन दिवसांत शपथविधी उरकणारे नेते दादांच्या विचारांच्या विरोधात जात आहेत का? असा प्रश्न त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात पेरला.
​स्वतःची अलिप्तता: शपथविधीशी आपला आणि कुटुंबाचा संबंध नाही, असे सांगून त्यांनी लोकांची सहानुभूती मिळवली.

​दोरी साहेबांच्याच हाती?
​राजकीय घड्याळाची चावी नेमकी कशी फिरवायची, हे पवारांना चांगलेच ठाऊक आहे. तटकरे आणि पटेल यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी पडद्यामागचे सूत्रधार समोर आणले. भाजपचे नाव न घेताही, या सर्व घडामोडींमागे कुणाचे नियोजन आहे, हे त्यांनी लोकांच्या लक्षात आणून दिले. सकाळच्या एका मुलाखतीने जो संदेश समाजमनात पोहोचवला, त्याचे दूरगामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येतील.

​पवारांच्या ‘पॉवर गेम’चे तीन मोठे परिणाम:
​१. विलीनीकरणाला ‘ब्रेक’: दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आता धूसर झाल्याचे सांगत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली.
२. सहानुभूतीची लाट: दादांच्या निधनानंतर सत्तेसाठी झालेल्या या ‘घाई’मुळे जनतेमध्ये सत्ताधारी गटाबद्दल काहीशी नाराजी निर्माण झाली आहे.
३. भाजपची गोची: या सर्व प्रकारात भाजप केवळ बघ्याची भूमिका घेत आहे की सूत्रधार आहे, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
​आजचा शपथविधी हा राष्ट्रवादीसाठी एका नवीन अंकाची सुरुवात असली, तरी या नाटकाचा ‘दिग्दर्शक’ आजही गोविंद बागेत बसून सूत्रे हलवत आहे. साहेबांच्या या ‘पॉवर गेम’मुळे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा आनंद साजरा करायचा की पवारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, अशा पेचात सध्या राष्ट्रवादीचे नेते अडकले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *