दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मात्र, या शपथविधीच्या घाईमागे ‘विलीनीकरणाची भीती’ आणि ‘नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ’ असल्याची चर्चा आता अधिक गडद झाली आहे.
शरद पवारांचा तो गौप्यस्फोट आणि नेत्यांची धाकधूक!
आज सकाळी बारामतीत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत राजकीय बॉम्ब टाकला. “१२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अधिकृत घोषणा होणार होती, तशी चर्चा अजितशी झाली होती,” असे सांगत पवारांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पवारांच्या या एका विधानाने हे स्पष्ट झाले की, अजितदादांना दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आणायचे होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही चर्चा का थांबली? उलट, तातडीने सुनेत्रा पवारांना शपथ देण्याचा निर्णय का घेतला गेला?
राजकीय जाणकारांच्या मते, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली असती, तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या मंत्र्यांचे महत्त्व कमी झाले असते. हे ‘सत्ताधारी’ अस्तित्व धोक्यात येऊ नये, म्हणूनच घाईघाईने सुनेत्रा वहिनींचे नाव पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अंबादास दानवे यांचा तिखट हल्ला: “स्वार्थासाठी थराला जातील!”
या घडामोडींवर शिवसेनेचे (UBT) नेते अंबादास दानवे यांनी अत्यंत गंभीर आणि जहरी टीका केली आहे. दानवे यांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “हे दोन्ही नेते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जाऊन निर्णय घेऊ शकतात. त्यांना ना नात्यांचे सोयरसुतक आहे, ना दुःखाचे गांभीर्य. केवळ आपली खुर्ची टिकवण्यासाठी त्यांनी सुनेत्रा वहिनींना राजकारणाच्या आखाड्यात ओढले आहे.” दानवे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे.
‘वर्षा’वर ठरली रणनीती; पार्थ पवारांचीही एन्ट्री!
शुक्रवारी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सव्वा तासाच्या बैठकीत ही सर्व रणनीती आखली गेल्याचे समजते. छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ‘राष्ट्रवादीचा कोटा’ स्वतःकडेच ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांचे नाव लावून धरले. एवढेच नाही, तर सुनेत्रा वहिनींकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊन पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. म्हणजेच, पवार कुटुंबातील एका गटाला सत्तेत वाटा देऊन आपला गट टिकवण्याचा हा ‘फुलप्रूफ’ प्लॅन असल्याचे दिसते.
घाई नेमकी कोणासाठी?
आजचा शपथविधी हा केवळ रिक्त जागा भरण्यासाठी नसून, तो शरद पवारांच्या ‘घरवापसी’च्या प्लॅनला कायमचा सुरुंग लावण्यासाठी घेतलेला निर्णय वाटतो. अजितदादांनी ज्या स्वाभिमानासाठी स्वतंत्र गट उभा केला, तो गट आता पवारांच्या सावलीपासून दूर ठेवण्याचा अट्टाहास काही बड्या नेत्यांमध्ये दिसत आहे. पण प्रश्न हा उरतो की, बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता या ‘पॉवर गेम’ला स्वीकारणार का?
—
Deepak Kaitke




