दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’ एक करुण शोकांतिका ठरला आहे. स्वतःच्या हिमतीवर विधानसभा खेचून आणण्याची ताकद असूनही, “माझा काका लई मोठा” ही भावना मनाच्या कोपऱ्यात जपणारा हा पुतण्या खरोखरच वेगळा होता.
विभाजन की विलीनीकरणाची पूर्वतयारी?
अजितदादांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडली, तेव्हा अनेकांना वाटले की हा नात्याचा अंत आहे. मात्र, पडद्याआडची वस्तुस्थिती काही वेगळीच होती. सत्तेत असूनही अजितदादांचा जीव काकांकडेच ओढ घेत होता. अलीकडच्या काळात त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणण्यासाठी जो इरादा दाखवला, तो त्यांच्या राजकीय परिपक्वतेचा पुरावा होता. विशेष म्हणजे, महायुतीत असतानाही त्यांनी भाजपविरोधी सूर आळवत आपली विचारांची स्पष्टता दाखवून दिली होती. काकांचा सन्मान शेवटपर्यंत अबाधित राहावा, हीच त्यांची एकमेव आणि अंतिम इच्छा होती.
‘नॉट रिचेबल’ होण्यामागची तगमग
अजितदादांच्या आयुष्यात काकांशी मतभेदाचे अनेक प्रसंग आले. हे मतभेद कधीच वैयक्तिक नव्हते, तर ते ‘कार्यशैली’तील होते. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद हुकल्यापासून ते नव्या पिढीला संधी देण्यापर्यंत दादांनी अनेकदा मनस्ताप सहन केला. अती त्रास झाला की दादा ‘नॉट रिचेबल’ व्हायचे, पण पुन्हा परत आल्यावर काकांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. राज्यातील इतर पुतण्यांनी काकांशी कटुता येताच कायमचे नाते तोडले, पण दादा आयुष्यभर ‘ॲडजस्ट’ करत राहिले. “शेवटच्या श्वासापर्यंत काकांना सोडणार नाही,” ही त्यांची भावना केवळ शब्दांपुरती मर्यादित नव्हती.
१२ डिसेंबरचे ते ‘अधुरे’ स्वप्न!
राजकीय सूत्रांनुसार, येत्या १२ डिसेंबरला म्हणजेच शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणून दादांना आपल्या काकांना एक ऐतिहासिक ‘भेट’ द्यायची होती. भाजपसारखा बलाढ्य पक्ष समोर असताना आणि आरोपांचे जाळे असतानाही, “पवारसाहेब मार्गदर्शक राहतील, तुम्ही का नको म्हणताय?” असा सवाल व्याकुळ होऊन विचारणारे दादा महाराष्ट्राने पाहिले आहेत. सख्ख्या मुलानेही कदाचित इतका सन्मान केला नसता, जेवढा या पुतण्याने आयुष्यभर वडिलांपेक्षा मानलेल्या काकांचा केला.
सत्तेचे नवे समीकरण आणि ‘पुतण्या’ची पोकळी
आज अजितदादांच्या निधनानंतर सत्तेचा डाव पुन्हा एकदा भाजपच्या नियोजनानुसार पडताना दिसत आहे. ज्या समझोत्यावर दादा महायुतीत गेले होते, ती कामे अद्याप अपूर्ण आहेत. आता सत्तेचा पर्याय निवडताना सुनेत्रा पवार आणि मुले दादांसारखीच निष्ठा काकांकडे ठेवतील का? हा मोठा प्रश्न आहे. दादांच्या निधनाने भाजपला आपले पुढील नियोजन करणे सोपे झाले असले, तरी शरद पवारांनी आपला सर्वात निष्ठावान आणि हक्काचा ‘योद्धा’ गमावला आहे.
अजितदादांचे राजकीय आयुष्य हे अंतर्विरोधाने भरलेले होते. एका बाजूला सत्तेची गरज आणि दुसऱ्या बाजूला काकांवरील प्रेम, अशा द्विधा मनस्थितीत ते आयुष्यभर जगले. पण प्रत्येक वेळी त्यांनी काकांचा आदर जपण्याचा प्रयत्न केला. काकांवर वडिलांपेक्षा अधिक प्रेम करू शकणारा हा पुतण्या राजकारणाच्या इतिहासात कायमचा ‘वेगळा’ ठरेल.
—
Deepak Kaitke




