टॉप स्टोरी राजकारण विदर्भ

चंद्रपुरात ‘महाविकास आघाडी’ला सुरुंग; वडेट्टीवारांशी खटके उडाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली?

विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाने मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले असून, राज्यातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाने मोठा दे धक्का दिला आहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूरच्या सत्तेसाठी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत वितुष्ट आल्यानंतर ठाकरे गटाने थेट विरोधी गोटात सामील होत सत्तेचा नवा मार्ग निवडला, ज्यामुळे काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

सकाळच्या वेळी वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांच्यात सत्तास्थापनेवरून खडाजंगी झाली होती. या वादातून गिऱ्हे थेट बाहेर पडले आणि अवघ्या काही तासांतच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी मुंबईतून ‘भाजपला रोखण्याचे’ आदेश दिलेले असतानाही चंद्रपुरात मात्र मशाल आणि कमळ एकत्र आल्याने राजकीय आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे सत्तेचे ‘सव्वा-सव्वा’ वर्षांचे समीकरण?

भाजप आणि ठाकरे गटात सत्तेचे जे वाटप ठरले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे:

महापौरपद विभागणी: पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्ममध्ये दोन्ही पक्षांचे महापौर विराजमान होतील.
पहिली संधी कुणाला? सत्तेच्या पहिल्या टप्प्यात स्थायी समितीचे अध्यक्षपद ठाकरे गटाकडे सोपवण्यात आले आहे.
भाजपकडे २३ जागांचे मोठे संख्याबळ असतानाही केवळ ६ जागा असलेल्या ठाकरे गटाला महापौरपद देऊन त्यांनी काँग्रेसची कोंडी केली आहे. ६६ सदस्यीय सभागृहात २७ जागा जिंकूनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने हा विजय वडेट्टीवार यांच्यासाठी वैयक्तिक धक्का मानला जात आहे. आता या स्थानिक युतीचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *