टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

मुंबईत ‘मातोश्री’ची मोठी माघार! रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित; उद्धव ठाकरेंनी २०१७ चा भाजपचा ‘पैरा’ फेडला?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शनिवारी एक मोठी राजकीय खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या शर्यतीतून माघार घेण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला आहे.

११ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच ‘मातोश्री’ने म्यान केलेल्या तलवारीमुळे भाजपच्या रितू तावडे यांचा मुंबईच्या महापौरपदी, तर शिंदे गटाच्या संजय घाडी यांचा उपमहापौरपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१७ च्या महापौर निवडणुकीत भाजपने शिवसेनेला दिलेली बिनविरोध संधी आज उद्धव ठाकरेंनी त्याच ‘राजकीय सौजन्याने’ परत केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

भाजपने सकाळीच अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या रूपाने मराठा कार्ड खेळत आक्रमक पवित्रा घेतला होता. महायुतीकडे असलेल्या काठावरील बहुमतामुळे ठाकरे गट आपला उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत वाढवेल, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र, दुपारी ‘मातोश्री’वर झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत आकड्यांचे गणित मांडण्यात आले आणि अखेर संघर्षापेक्षा माघार घेण्यावर शिक्कामोर्तब झाले.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले की, महापालिकेतील सद्यस्थिती पाहता आम्ही उमेदवार न देण्याचे ठरवले असून, आगामी काळात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडू.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही केवळ आकड्यांची माघार नसून त्यामागे एक मोठे राजकीय सूत्र दडलेले आहे. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी जो त्याग केला होता, त्याची परतफेड आज उद्धव ठाकरेंनी केली आहे.

एकीकडे भाजपने रणनीती आखून सकाळीच आघाडी घेतली असताना, ‘मातोश्री’ने घेतलेला हा सबुरीचा पवित्रा अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेवर आता अधिकृतपणे महायुतीचा झेंडा फडकला असून, ११ फेब्रुवारीला केवळ विजयाचा गुलाल उधळण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *