सातारा, दि. २ प्रतिनिधी:महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभर बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमामुळे दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना फोनवरून मनधरणी करताना दिसत आहेत. याबाबत त्यांनी आज मंचावरून जाहीर माफीही मागितली.
देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात म्हणाले, “खरं म्हणजे मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही. पण आज मंचावर बसून मोबाईलवर सतत बोलत होतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज परत घेण्याचा आज शेवटची दिवस आहे. सगळ्या पक्षांमध्ये एवढी बंडखोरी आहे की त्यांची मनधरणी केल्याशिवाय अर्ज मागे घेत नाहीत. मी कार्यकर्त्यांना विनंती करत होतो की फॉर्म परत घे, त्यामुळे मी फोनवर बोलत होतो. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. मात्र, मी बहुश्रुत आहे, फोनवर बोलतानाही इथे काय बोलणे चालले होते याकडे माझे लक्ष होते.”
“अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचे काम केले. आज मला असे वाटते की जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत आपला मराठीचा अभिमान असाच कायम राहील. मराठीची सेवा आपण करत राहू. मी निश्चितपणे सांगू इच्छितो की साहित्यिकांचे कार्यच आहे की साहित्याची निर्मिती मनोरंजनाकरता नाहीये, समाजातील जाणिवा विस्तारित झाल्या पाहिजेत याकरता साहित्याची निर्मिती होत असते. म्हणून कधी टीका झाली, गौरव झाला तरीही त्याचे कोणतेही वाईट वाटून घेणाऱ्यांतले आम्ही नाही. मला असं वाटतं की एखादी टीका झाली, ती योग्य असेल तर त्यातून सुधारण्याचा मार्ग दिसतो. आपल्याला सर्व समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांतले आम्ही नक्की नाही. असे कोणी वावरू नये असे समजणारा मी आहे”, असे फडणवीस म्हणाले.
“साहित्य संमेलन दिशादर्शक असतं. अध्यक्षीय भाषणातून पुढच्या वर्षाची दिशा मिळते. अशाच प्रकारचे मार्गदर्शन यातून होत राहील. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही. आम्हाला रसही नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, पण साहित्यात राजकारण आणू नये अशी मी विनंती करतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.




