महाराष्ट्र

कोल्हापुरात सर्वात मोठी काँग्रेस, तरीही तीन जागांच्या कमतरतेमुळे सत्ता निसटली

कोल्हापूर, दि. १६ प्रतिनिधी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि महायुती यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत पाटील यांनी ३७ जागा जिंकून काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवले, मात्र अवघ्या तीन जागांच्या कमतरतेमुळे सत्ता त्यांच्या हातून निसटली.

आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर दक्षिण, तुम्ही म्हणाल तसं’ या मोहिमेद्वारे निवडणूक एकहाती अंगावर घेतली होती. काँग्रेसने ८१ पैकी ७५ उमेदवार मैदानात उतरवले होते, त्यापैकी ३७ विजयी झाले. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) केवळ एका जागेवर मर्यादित राहिल्याने सतेज पाटलांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येथे खातेही उघडता आले नाही.

महायुतीच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ताकद पणाला लावली होती. महायुतीत भाजपने २४ जागा मिळवत मोठे यश संपादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. जनसुराज्याच्या एका जागेसह महायुतीचा आकडा ४३ वर पोहोचला असून त्यांनी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *