महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १६ : अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.एकूण ८० जागांच्या सभागृहात भाजपला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले असून, स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ४१ या बहुमताच्या आकड्यापासून भाजप तीन जागांनी दूर राहिला आहे. २०१७ मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला यंदा इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
युती नसल्याचा फटका
भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढल्यामुळे अकोल्यात भाजपला मोठा फटका बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चाळीसच्या पुढे सहज जाऊ शकणारा भाजप मतविभाजनामुळे अनेक प्रभागांमध्ये पिछाडीवर पडला. शिवसेनेसोबत युती नसल्याने भाजपच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस, वंचित, एमआयएमसह इतर पक्षांना झाला.
दिग्गजांचा पराभव भाजपसाठी धक्कादायक
या निवडणुकीत भाजपचे अनेक प्रस्थापित नगरसेवक पराभूत झाले. भाजपचे अजय शर्मा, सागर शेगोकार यांना पराभव पत्करावा लागला.




