अकोला महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत नसताना भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने बहुमताचे गणित जुळवले आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपाने अकोला महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापित केली असून भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड झाली आहे.
राज्यातील २९ महापालिकांपैकी अकोला महापालिकेला अखेर महापौर मिळाला आहे. भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने आपले संख्याबळ ठामपणे सिद्ध करत महापौर व उपमहापौर दोन्ही पदांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदासाठी भाजपच्या शारदा खेडकर यांना ४५ मते मिळाली, तर उद्धव सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांना केवळ ३२ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले, तर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी थेट भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकले. त्यामुळे विरोधकांकडून ३६ चा दावा केला जात असलेला आकडा प्रत्यक्षात ३२ वर घसरला आणि सत्तेचे पारडे भाजपकडे झुकले.
महापौर निवडीनंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहिला. शहर सुधार आघाडीचे उमेदवार अमोल गोगे यांना ४५ मते मिळून ते उपमहापौरपदी निवडून आले, तर काँग्रेसचे उमेदवार आजाद खान (अलीयार खान) यांना ३२ मते मिळाली. यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून विविध पातळ्यांवर जोरदार हालचाली, संपर्क आणि राजकीय जुळवाजुळव सुरू होती. मात्र एमआयएमचा तटस्थ आणि अपक्ष नगरसेवकाचा भाजपला मिळालेला पाठिबा या दोन घटकांनी विरोधकांच्या सर्व गणितांवर पाणी फेरले. परिणामी, भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे संख्याबळ ४५ वर स्थिरावले आणि विरोधकांना अनपेक्षित धक्का बसला.
अकोला महानगरपालिकेमध्ये एकूण 80 जागांसाठी 41 हा बहुमताचा आकडा होता. भाजपा 38, काँग्रेस 21, शिवसेना ठाकरे गट 6, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, राष्ट्रवादी शरद पवार गट 3, वंचित बहुजन आघाडी 5, एआयएम आयएम 3, अपक्ष 2 असे पक्षनिहाय संख्याबळ आहे




