महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. १६ : भारतीय जनता पक्षाच्या डबल इंजिन सरकारच्या विकासाच्या दाव्याला फोल ठरवत चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेत काँग्रेसला झुकते माप दिले. चंद्रपूर मनपात सर्वाधिक जागेवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
भाजपाला २३ जागेवर समाधान मानावे लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष २७, भाजपा २३, उबाठा ६, भारतीय शेतकरी कामगार पक्ष ३, वंचित बहुजन आघाडी २, बीएसपी १, एमआयएम १, शिंदे सेना १, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस व समविचारी पक्षाने बहुमत प्राप्त केले आहे.
काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया देताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या भ्रष्ट धोरणामुळे, फसव्या घोषणा आणि सत्तेच्या अहंकारामुळेच जनतेने भाजपला नाकारले आहे. चंद्रपूरकरांनी विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामधील आपसी वाद, जुनेच तीनदा, चारदा नगरसेवक असलेले उमेदवार, जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे भाजपाला या निवडणुकीत अपयशास कारणीभूत ठरले आहे.




