चंद्रपूरचा सस्पेन्स थ्रिलर : किंगमेकरच्या अटीने काँग्रेस-भाजपची कोंडी; महापौरपदाचा ‘पेच’ आता ‘मातोश्री’च्या दरबारी!
चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकारणात ‘काँटे की टक्कर’ निर्माण केली असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेला आहे. “अडीच वर्ष महापौरपद आमचेच, नाहीतर सत्तेला विसरा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही बड्या पक्षांच्या छातीत धडकी भरली आहे. या राजकीय पेचप्रसंगावर आज मुंबईत ‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार असून चंद्रपूरचा नवा ‘किंग’ कोण ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ताट समोर, पण घास घेता येईना!
६६ जागांच्या चंद्रपूर महापालिकेत २७ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा ३४ हा आकडा गाठताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. दुसरीकडे २३ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपनेही सत्तेसाठी जोर लावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे ६ आणि ‘वंचित’चे २ असे एकूण ८ नगरसेवक सत्तेच्या चाव्या घेऊन बसले आहेत. त्यांच्या सोबतीला २ अपक्ष नगरसेवक आल्याने या १० जणांच्या गटाने काँग्रेस आणि भाजप दोघांनाही ‘वेटिंग’वर ठेवले आहे.
ठाकरे गटाची ‘किचकट’ अट
”काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, जेवण समोर आहे पण हात बांधलेले आहेत,” अशी खोचक टीका करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्तेची मोठी किंमत मागितली आहे. अडीच वर्ष महापौरपदाच्या अटीवर ठाकरे गट ठाम आहे. जर हे पद मिळाले नाही, तर अडीच वर्ष उपमहापौर आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे स्थायी समितीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.
राजकीय वळण: भाजप की काँग्रेस?
ठाकरे गटाने आपले पत्ते अद्याप पूर्णपणे उघड केलेले नाहीत. महाविकास आघाडी धर्म पाळून काँग्रेसला साथ द्यायची की ‘राजकारणात काहीही घडू शकते’ म्हणत भाजपच्या गोटात सामील व्हायचे, याचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. भाजपने ही अट मान्य केल्यास चंद्रपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे आहे पक्षीय बलाबल (एकूण ६६ जागा):
काँग्रेस: २७
भाजप: २३
शिवसेना (UBT): ०६
वंचित बहुजन आघाडी: ०२
अपक्ष व इतर: ०८
’मातोश्री’वरून निघणार सत्तेचा आदेश
आज चंद्रपूरचे सर्व नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख मुंबईत दाखल झाले आहेत. सत्तेत कोणासोबत जायचे आणि वाटाघाटी कशा करायच्या, याचे आदेश थेट उद्धव ठाकरे देणार आहेत. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत चंद्रपूरच्या महापौरपदाचा पडदा उठणार असून कोणाची सत्ता येणार, याचे चित्र स्पष्ट होईल.




