टॉप स्टोरी महाराष्ट्र

आशा सेविकांच्या संघर्षाला सन्मानाची किनार

डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून दिंद्रुड येथे पैठणी देऊन गौरव, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची भावनिक साक्ष

बीड :- ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांच्या संघर्षाला सन्मानाची किनार देत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा भावनिक व प्रेरणादायी सन्मान सोहळा माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे पार पडला. देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या भव्य “आशा सन्मान सोहळ्या”त आशा सेविकांना अस्सल पैठणी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आशा सेविकांच्या संघर्षाचे आणि सेवाभावाचे मनापासून कौतुक करताना, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे कार्य डॉ. ओमप्रकाश शेटे प्रामाणिकपणे करत असल्याचे प्रतिपादन केले.

कोविडसारख्या कठीण काळातही आशा सेविकांनी जीव धोक्यात घालून घराघरांत जाऊन तपासणी, जनजागृती आणि रुग्णसेवा केली. मात्र असे असूनही शासकीय व सामाजिक पातळीवर त्यांची उपेक्षा होत असल्याची खंत व्यक्त करत वर्षा उसगावकर म्हणाल्या की, आशा सेविका या समाज आणि आरोग्य विभाग यांच्यातील जिवंत दुवा आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन्मान करण्याची संकल्पनाच माणुसकी जपणारी आहे. मोठ्या पदावर कार्यरत असतानाही कोणताही अभिनिवेश न बाळगता उपेक्षित घटकांसाठी झटणाऱ्या डॉ. शेटे यांच्या कार्यातून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती, हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई रोटरीचे माजी गव्हर्नर राजेंद्र अगरवाल, चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे मुख्य ट्रस्टी राजेंद्र पाठक, सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीभाऊ रांजवण आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, उद्योजक शिल्पा शेटे यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याच सन्मान सोहळ्यात आशा सेविकांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आशा’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तसेच डॉ. शेटे यांच्या आवाहनावरून गरीब बालके व रुग्णांसाठी सातत्याने मदत करणाऱ्या राजेंद्र अगरवाल आणि राजेंद्र पाठक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देवदूत प्रतिष्ठान व खोलेश्वर परिवार, दिंद्रुड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश गटकळ यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मांडली.

आभार प्रदर्शन देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले.यावेळी बोलताना डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या सामाजिक दरीबद्दल चिंता व्यक्त करत अशा उपक्रमांमधून ही दरी सांधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिकवणीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत, आशा सेविकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे प्रामाणिकपणे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवत…

राज्यात प्रशासन, विकास आणि संवेदनशीलतेचा समतोल साधत काम करण्याची दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणारे उपक्रम राबवण्याचे काम डॉ. ओमप्रकाश शेटे प्रामाणिकपणे करत आहेत. शिस्तबद्ध नियोजन, निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची ही कार्यपद्धती राज्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक ठरत आहे. अशा लोकाभिमुख कामकाजामुळे केवळ प्रशासन बळकट होत नाही, तर समाजात विश्वास, स्थैर्य आणि सकारात्मक बदलांची पायाभरणीही होते. बिडचा विकास करणारा माणूस म्हणून डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे अवघा बिड जिल्हा पाहतोय अशा अनेकांच्या भावना कार्यक्रम स्थळी होत्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *