दीपक मोहिते वसई, दि. १६:वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज विरार येथे पार पडली. सकाळी ११:०० च्या सुमारास सुरू करण्यात आलेली मतमोजणी सुरुवातीस अत्यंत संथगतीने सुरू होती. त्यामुळे निकाल हाती यायला विलंब होत होता. यामुळे उमेदवार धास्तीच्या सावटाखाली आले होते.
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने मनसे व काँग्रेसच्या सोबतीने सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये प्रत्येक प्रभागात (एकूण जागा ११५) पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. बहुजन विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारताना भाजपला डोके वर काढूच दिले नाही. चौथ्या फेरी दरम्यान भाजपने अनेक प्रभागात बाजी मारली. पण त्यानंतर मात्र बहुजन विकास आघाडीची ११३ वरून ८४, नंतर ६३ अशी घसरण होत गेली. तर दुसरीकडे भाजपने २६ वरून ४५ पर्यंत झेप घेतली.
या सर्व धामधुमीत बविआचे माजी नगरसेवक पंकज ठाकूर, हार्दिक राऊत, धनंजय गावडे, प्रवीण नलावडे, माया तळकर, गीता आयर, वृंदेश पाटील, हे पराभूत झाले. तर दुसरीकडे भाजपचे नितीन ठाकूर, यशोधन ठाकूर, धीरज कुलकर्णी, महेश पाटील, शिंदे गटाचे सुदेश चौधरी यांचाही पराभव झाला. या लढतीत बहुजन विकास आघाडीने ७१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले, तर भाजप केवळ ४३ चा टप्पा गाठू शकला. शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना (उबाठा), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या सर्व पक्षांची पाटी कोरी राहिली.
यापैकी अनेकांना आपल्या अनामत रकमाही वाचवता आल्या नाहीत. बहुजन विकास आघाडीला मिळालेले मताधिक्य लक्षात घेता महापौरपदी त्यांच्याच पक्षाच्या व्यक्तीची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी माजी आ. हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःच्या शिरावर घेतली व प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे या निवडणुकीत भाजपची मात्रा चालू शकली नाही.




