चंद्रपूर टॉप स्टोरी

चंद्रपूरच्या महापौरपदाचा निकाल आता ‘१० जनपथ’वर? वडेट्टीवार यांच्या १८ नगरसेवकांनी दिल्लीत ठाण मांडल्याने धानोरकर गटाचे टेन्शन वाढणार?

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. हा वाद सोडवण्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या १८ समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली असून, नुकतीच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान वडेट्टीवार यांनी स्थानिक राजकीय परिस्थिती आणि बहुमताचा आकडा वेणुगोपाळ यांच्यासमोर मांडला असून, राहुल गांधी या प्रकरणावर अंतिम मोहोर उमटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसकडे २७ नगरसेवक आणि जनविकास सेनेचे ३ अशा ३० सदस्यांचे पाठबळ असूनही केवळ नेतृत्वाच्या वादामुळे चंद्रपूरची सत्ता टांगणीला लागली आहे. प्रदेश पातळीवर हा वाद मिटवण्यात अपयश आल्याने आता चेंडू थेट दिल्लीच्या कोर्टात गेला आहे. वडेट्टीवार गटाने वेणुगोपाळ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आपल्या बाजूच्या नगरसेवकांची संख्यात्मक ताकद दाखवून दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वडेट्टीवार यांनी आपल्या समर्थकांपैकीच एकाला महापौरपदाची संधी मिळावी असा आग्रह धरला असून, केंद्रीय नेतृत्वाने दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा करून सुवर्णमध्य काढण्याचे आश्वासन दिले आहे.

दुसरीकडे, खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही आपली बाजू भक्कम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला असून, स्थानिक राजकारणात त्यांचे वर्चस्व डावलले जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. काँग्रेसच्या या अंतर्गत यादवीचा फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही दबा धरला असून, २४ नगरसेवक असलेल्या भाजपने इतर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सत्तापालट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे काँग्रेस हायकमांडला आता तात्काळ आणि ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा चंद्रपूरची सत्ता हातातून जाण्याची भीती कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *