टॉप स्टोरी महाराष्ट्र

महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची भावना


थेट विधानभवनातून:गजानन तुपे,मुंबई, दि. २३

“अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. ‘कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण कायम उपमुख्यमंत्री राहीन,’ असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. परंपरेनुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या शोकप्रस्तावात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी भाजप आमदार राज पुरोहित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आज मनात वादळ आहे. अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडावा लागेल, याची कल्पनाही करवत नाही. सभागृहात उजव्या बाजूला पाहिले की अजितदादा दिसायचे. कितीही उशिरापर्यंत कामकाज चालले तरी ते शेवटपर्यंत बसलेले असायचे.”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात स्थिरावलेले आणि नेतृत्व सिद्ध केलेले अजित पवार यांचे जाणे म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण होणे आहे. आता दुसरे ‘अजितदादा’ होणे शक्य नाही.” दशकाहून अधिक काळाच्या मैत्रीचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या एक दिवस आधी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीची आठवण सांगितली. “बैठकीनंतर पायाभूत सुविधांवर चर्चा झाली. त्यांच्या सिग्नेचर शैलीत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक मुद्दा त्यांनी कागदावर नोंदवून ठेवलेला असायचा. त्यानंतर आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या; पण ती शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती,” असे ते म्हणाले. “एक दशकाहून अधिक काळ आमची मैत्री होती,” असेही त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय अजित पवार यांना
“निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना आणण्याचे ठरवले. मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला आला तेव्हा काहींनी राज्याच्या तिजोरीवर ताण येईल, अशी चिंता व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार यांनी काटेकोर आर्थिक नियोजन करून ही योजना प्रत्यक्षात आणली,” असे मुख्यमंत्री म्हणाले. विकास प्रकल्पांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, “त्यांच्या टेबलावर फाईलींचा ढीग कधी दिसला नाही. ते अधिकाऱ्यांना थेट बोलावून घेत आणि तात्काळ योग्य निर्णय घेत. त्यांची ठाम पाठराखण करत.”
२०१९ मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. वरिष्ठांनी नंतर भूमिका बदलली; पण अजितदादांनी ‘मी शब्द दिला आहे’ असे ठामपणे सांगितले. शपथविधीनंतर न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. वर्षा बंगल्यावर बसून आम्ही तो निर्णय मागे घेण्याचे ठरवले.” त्या काळातील त्यांची भूमिका आणि धैर्य त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. “‘सकाळी ९ वाजता झालेला शपथविधी हा पहाटेचा नव्हता,’ असे अजित पवार कायम सांगायचे,” अशी आठवणही त्यांनी सांगितली.
अजित पवार यांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “मंत्रालयात अधिकारी येण्यापूर्वीच अजितदादा पोहोचायचे. मंत्रालयाच्या कामकाजाची सुरुवातच त्यांच्या उपस्थितीने व्हायची.”

जगाचा निरोप घेण्याचा तुमचा निर्णय चुकला, परत या! –

शिंदेंचा हुंदका फुटला
​मुंबई, दि. २३ प्रतिनिधी
​”राजकारणात तुम्ही घेतलेले निर्णय अचूक होते हे जनतेने सिद्ध केले, पण दादा, जगाचा निरोप घेण्याचा तुमचा हा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या…” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावेळी एकनाथ शिंदे कमालीचे भावूक झाले होते, त्यांच्या शब्दाशब्दांतून जिवलग मित्र गमावल्याचे दुःख ओसंडून वाहत होते.

​’ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ कोसळला

महाराष्ट्राच्या राजकारणातील मजबूत त्रिकुटाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, “मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र होतो म्हणून महाराष्ट्राची प्रगती वेगाने सुरू होती. मात्र, २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधारच हिरावून नेला. नियतीने केलेला तो घात पाहून आजही मनाचा थरकाप उडतो.”
​प्रशासनाचा ‘स्कॅनर’ आणि फणसासारखं व्यक्तिमत्व
अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण सांगताना शिंदेंनी त्यांच्या प्रशासकीय शिस्तीचे कौतुक केले. “दादांची नजर फाईलवरून फिरली की काही सेकंदात चुका समोर यायच्या. साध्या लटकणाऱ्या वायरपासून ते चुकीच्या पायरीपर्यंत, ते कोणाचीही गय करायचे नाहीत. ११ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बाहेरून फणसासारखे कडक वाटणारे दादा आतून मात्र अत्यंत मृदू मनाचे होते. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी राज्याच्या अर्थकारणाचा जो समतोल राखला, तो केवळ दादाच करू जाणे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

​मैत्रीचे किस्से आणि तो खंबीर पाठिंबा

शिंदे यांनी त्यांच्या मैत्रीतील एक गुपितही यावेळी उघड केले. हॉटेल हयात मधील एका महत्त्वपूर्ण बैठकीत जेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होती, तेव्हा अजितदादांनीच “एकनाथराव असतील तर आम्हाला चालेल” असे ठामपणे सांगून माझ्यावर विश्वास दाखवला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. “दादा मला नेहमी रात्री उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि तब्येतीची काळजी घेण्याचा वडिलकीचा सल्ला द्यायचे,” असे म्हणताना शिंदेंचा कंठ दाटून आला.

अपघाताची चौकशी करा – भास्कर जाधव

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे लोटला जात होता. मात्र, अजित पवारांसारख्या नेत्याचा अपघात होणे शक्य वाटत नाही; त्यामुळे मनात आजही संशय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य महाराष्ट्रासमोर यावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी केली. ते पुढे म्हणाले, “रोहित पवार अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. काही जण शरद पवार आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यांत विसंगती असल्याचे सांगत आहेत. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात एक कागद होता. त्यांनी त्यातील एक ओळ वाचत ‘हा घातपात नसून अपघात आहे; याला कोणताही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये,’ असे स्पष्ट केले होते. त्या वेळी परिस्थिती अत्यंत नाजूक होती. जर ठिणगी पडली असती, तर गंभीर परिणाम झाले असते, याची जाणीव शरद पवारांना होती. म्हणूनच त्यांनी ते वक्तव्य केले. तरीदेखील या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” असे भास्कर जाधव यांनी नमूद केले.

निधनाच्या वृत्ताने मन सुन्न झाले – मुश्रीफ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर अतिशय जवळचे संबंध होते असे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘अजित पवारांना दृष्ट लागली’, असे म्हणत मुश्रीफांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी भावूक झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा कंठ दाटून आला व त्यांना अश्रू अनावर झाले. ‘अजित पवार सोडून गेले’, असे भावनिक उद्गार त्यांनी सभागृहात काढले. अजित पवार कामाच्याबाबतीत अतिशय वक्तशीर आणि कडक शिस्तीचे नेते होते असे हसन मुश्रीफ म्हणाले. सभागृहात हेडमास्तर प्रमाणे वागणाऱ्या अजित पवारांचा प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर उत्तम वचक होता. साखर कारखानदारी आणि बँका याबाबत अजित पवारांची वेगळी मतं होती. याबाबत त्यांनी केंद्रात अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. ‘बारामतीसोबतच अजित पवारांचे कोल्हापूरवर देखील विशेष प्रेम होते’, असे मुश्रीफ यांनी सांगितले. अजित पवारांच्या अपघाताचे वृत्त फोनवरुन समजले त्यानंतर टीव्हीवर बातमी पाहिली आणि लगेच बारामती गाठली. दोन दिवस बारामतीत न झोपता थांबलो. ‘आमच्या नेत्याची अशी बातमी कधी कानावर येईल असे वाटले नाही’, असे सांगताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

कुणाची नजर लागली माहित नाही – जयंत पाटील

दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहित नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येत असल्याच्या भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राजकारणातील मिश्कीलपणा हरपला- रोहित पवार

दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. “तुझ्या शर्टचे वरचे बटण नेहमी उघडे असते; ते लावत जा,” असे अजित पवार मला सांगायचे. मात्र, चाळीस–पन्नास वर्षांनंतर जेव्हा दादांची वर भेट होईल, तेव्हाच मी ते बटण लावेन. तोपर्यंत ते तसेच उघडे ठेवेन, जेणेकरून दादांची मला रोज आठवण येत राहील,” असे रोहित पवार म्हणाले. तसेच, अजितदादांच्या अपघातासाठी जो कोणी जबाबदार असेल, त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
‘अजितदादा पवार’ नावाचा जादूगार संपूर्ण महाराष्ट्राला हसवत-हसवत निघून गेला. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा हरपला,” असेही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत अनेक आठवणींना उजाळा दिला.
रोहित पवार म्हणाले, “एकदा अजितदादा मला म्हणाले होते, ‘रोहित, तुझे झिपऱ्या वाढल्या आहेत; त्या कमी कर.’ दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. ते नेहमी म्हणायचे, ‘तुझे शारीरिक वजन वाढले आहे; ते कमी कर आणि राजकीय वजन वाढव.’ मी त्यावर फक्त ‘हो’ म्हणायचो. आज मी अजितदादांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन, शारीरिक वजन कमी करेन आणि राजकीय वजन वाढवेन.”

दादा आमचा रुबाब आणि माज घेऊन गेले- आदिती तटकरे

आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्त्वात आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, हा आमचा रुबाबदार नेता,चालत यायचे तेव्हा तो रुबाबदार पणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आज नेता जात असताना, तो रुबाबदार नेता एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाबदारपणा आणि माजही निघून गेला, असे आदिती तटकरे म्हणाल्या. अजितदादांना जाऊन महिना होत आला, आम्हाला सर्वांना कुठेतरी वाटायचे ते आमच्यामध्ये असतील, असे वाटायचे पण तो भ्रम आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर तुटला, असेही आदिती तटकरे म्हणाल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *