टॉप स्टोरी राजकारण

कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात मुंबईत हिशोब चुकता; भाजप शिंदेंना उपमहापौरपदही नाकारणार का?

विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ७ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाच, सत्तेच्या वाटपावरून युतीत ठिणगी पडली आहे. ‘कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये आम्ही त्याग केला, आता मुंबईत आम्हाला पूर्ण मोकळीक द्या,’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी शिंदे गटाला उपमहापौर आणि तिजोरीच्या चाव्या असलेली स्थायी समिती देण्यास विरोध दर्शवला आहे.
संख्याबळ आणि सत्तेचे गणित
मुंबई महापालिकेत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शिंदे गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्तेच्या जादुई आकड्यासाठी भाजपला शिंदे गटाची गरज असल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र गटनोंदणी केली आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपद शिंदे गटाकडे, असे साधे गणित मांडले जात होते. मात्र, भाजपच्या नव्या पवित्र्यामुळे हे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
भाजपचा युक्तिवाद काय?
भाजपमधील एका वरिष्ठ गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत भाजपने मोठेपणा दाखवत महापौरपदावरील दावा सोडला आणि तो शिंदेंच्या शिवसेनेला दिला. त्या बदल्यात आता मुंबई महापालिकेत शिंदे गटाने सत्तेच्या महत्त्वाच्या पदांवर दावा करू नये. मुंबईचे महत्त्व पाहता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती ही तिन्ही प्रमुख पदे भाजपकडेच असावीत, असा आग्रह धरण्यात येत आहे.
त्यामुळे ठाण्यातील तडजोडीची किंमत शिंदे गटाला मुंबईत मोजावी लागणार का आणि भाजप खरोखरच आपल्या मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *