संयुक्त किसान मोर्चा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडकणार!

मुंबई, दि.१२। दिनेश चिलप मराठे महासागर विशेष सध्या महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते हे लोकाभिमुख शासनाची भूमिका विसरून केवळ सत्तेच्या सारीपाटामध्ये गुंतून गेलेले आहेत. राज्यामध्ये गेल्या वर्षभरात ४५ हजार शेतऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे मोदी ९ व दुसरीकडे पक्षाचे झेंडे नाचवणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमाची चमकोगिरी होत असून यामध्ये केवळ दिखाऊपणा सुरु असून राज्यातील स्वतःला शेतकरी कुटुंबातील म्हणवून घेणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारने सामान्य शेतकऱ्यांना पुर्णपणे वाऱ्यावर सोडलेले आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावर धडक देण्याच्या तयारीत संयुक्त किसान मोर्चा (अराजनैतिक) च्या राज्यातील विविध संघटना एकत्रित आलेल्या असल्याची माहिती आज बुधवार ता.१२ रोजी राष्ट्रीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शंकर दरेकर यांनी आज मुंबईत दिली. यावेळी त्यांच्या सोबत संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य नितीन थोरात, संदीप पाटील, कमल सावंत,एस.बी.पाटील, मकरंद जुनावणे, आबासाहेब जाधव, युवराज सूर्यवंशी, महेश राणे,राहूल शिंदे,रामदास खराडे आणि लक्ष्मण वंगे यांच्यासहित अन्य सहकारी उपस्थित होते.

यावेळी शंकर दरेकर पुढे म्हणाले कि,याच विषयासंदर्भात सद्यस्थितीबाबत मुंबईत एक बैठक पार पडली.या बैठकीत विविध ठिकाणच्या २४ संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.या बैठकीत राज्य सरकारवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून दबाव आणण्यासाठी निर्णायक शेतकरी लढयाचे आंदोलन करण्याचे ठरले आहे.पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे राजकीय स्फूर्तीस्थान असलेल्या कराडच्या प्रीतिसंगम ते विधानभवन असा धडक शेतकरी मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. पावसाची राज्यातील स्थिती पहाता सध्या केवळ ४ ते ५ जिल्हयात धान्य पेरणीची परिस्थिती असून २८ जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. याप्रसंगी राज्यसरकारने तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना करणे क्रमप्राप्त होत आहे.मात्र सध्या केवळ सारीपाटावरील रुसवे फुगवे दिसत आहेत. शेतकऱ्यांचा आम्ही कैवार घेतलाय असे भासविणारे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात चकरा मारत आहेत हे मुख्यमंत्री शिंदे यांना शोभणारे नाही. आजच्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांचे अस्तित्व जवळपास संपल्यात जमा झाले आहे.त्यांना जगवायचे असल्यास या आंदोलनाच्यावतीने काही प्रमुख मागण्या सरकार समोर मांडण्यात येत आहेत असे शंकर दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *