माणूसपणाची पाऊलवाट

कणसाच्या माईकपासून मंत्रालयापर्यंत… अफलातून कार्यकर्ता परमेश्वर इंगोले यांचा प्रेरणादायी प्रवास

शेती, जनावरे यांत वावरणारा, शेतातील डुलणाऱ्या कणसाला हाताने धरून त्याचा माईक करीत पुढ्यात असलेल्या ताटांना जनता समजून भाषण देणारा एक लाजरा-बुजरा, साधा मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, बेरोजगारांच्या, निराधारांच्या आणि युवकांच्या समस्या सोडवणारा अफलातून कार्यकर्ता बनला. पुढे जाऊन आपला मुलगा नाव उज्ज्वल करणार, हे त्याच्या आई-वडिलांना लहानपणीच जाणवले होते. ग्रामीण जगण्यातील दाहक वास्तव आणि त्यावर काहीतरी करण्याची तीव्र आस त्याच्या डोळ्यांत बालपणापासूनच दिसत होती. सामाजिक आणि राजकीय पटलावर अभूतपूर्व यश संपादन करणारा अफलातून कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवलेल्या परमेश्वर इंगोले यांचा हा प्रवास निश्चितच नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बुद्रुक तालुक्यातील सोनगाव या छोट्याशा गावात, एका शेतकरी कुटुंबात, अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी परमेश्वर शेषराव इंगोले यांचा जन्म झाला. ग्रामीण जीवनातील वास्तव आणि त्यातील भीषणतेचे चटके त्यांनी लहानपणीच सोसले. मात्र आई-वडिलांनी मुलाने शिकून मोठे व्हावे, यासाठी नेहमीच त्याला प्रेरित केले. परिस्थितीशी दोन हात करायचे असतील तर शिक्षण हाच मार्ग आहे, या ठाम जिद्दीने परमेश्वर इंगोले यांनी बी.ए., एम.ए., डी.एड. आणि बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

इतके शिक्षण घेऊनही परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नव्हते. कारण शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (सीईटी) २०१० नंतर बंद झाली होती. परिणामी महाराष्ट्रभर सुमारे दहा लाख डी.एड. आणि बी.एड.धारक विद्यार्थी बेरोजगार झाले. शिक्षक होऊन स्थिर जीवन मिळेल, या आशेने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी डी.एड., बी.एड.कडे वळले होते; मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांच्या आयुष्याचा खेळ होताना पाहून परमेश्वर इंगोले पेटून उठले. याच क्षणी त्यांनी मनाशी पक्की खूणगाठ बांधली — आता फक्त लढायचे आणि डी.एड., बी.एड.धारकांना रोजगार मिळवून द्यायचाच!

या निर्धाराला योग्य दिशा आणि बळ मिळाले ते सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ व्यासपीठामुळे. महाविद्यालयाचा बिनविरोध अध्यक्ष म्हणून येथे त्यांची निवड झाली. या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी केवळ डी.एड., बी.एड.धारक बेरोजगारांचा प्रश्न मांडला नाही, तर युवक, कामगार, निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिला यांच्या हक्कांसाठी शासन व जनतेतील एक प्रभावी दुवा म्हणून ते कार्यरत राहिले. बचत गटांच्या माध्यमातून शिक्षक आणि युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी व पीकविमा मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने केली. ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासन-लाभार्थी समन्वय साधून त्यांचा हक्क मिळवून देण्यात ते सदैव अग्रेसर राहिले.

महाराष्ट्रातील दहा लाख डी.एड., बी.एड.धारकांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी त्यांनी राज्यभर जिल्हा परिषदांसमोर आंदोलने केली, मुंबईच्या आझाद मैदानावर आवाज बुलंद केला, राज्यव्यापी मोर्चे काढले. अखेरीस शासनाला झुकविण्यात यश आले आणि २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. यातून सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. २०२२ मध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पार पडला.

शिक्षण सेवकांना मिळणाऱ्या ६,००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलने केली. परिणामी गेल्या वर्षी शिक्षण सेवकांचे मानधन १६,००० रुपये झाले. एवढ्यावरच न थांबता, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच एमपीएससी परीक्षार्थी यांच्यासाठीही त्यांनी सक्रिय चळवळी उभ्या केल्या.

ते अभिमानाने सांगतात की ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई व लिपिक यांच्या किमान वेतनवाढीचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला. महाराष्ट्रातील सुमारे ६०,००० कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुपटीने वाढ करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. २०१९ मध्ये मराठा आरक्षण प्रश्नामुळे २३० मराठा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. दहा दिवसांचे उग्र आंदोलन करून या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यात त्यांनी यश मिळवले.

यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आर. आर. पाटील यांच्या भाषणांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. यामुळे त्यांचे नेतृत्वगुण अधिक विकसित होत गेले. ‘यिन’ व्यासपीठामुळे या गुणांना बळ मिळाले आणि ते यशाची एक-एक शिखरे सर करू लागले. विधानभवन, मंत्रालय, संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि प्रधानमंत्री कार्यालय येथे प्रत्यक्ष कारभार पाहण्याची संधी त्यांना मिळाली. ते मनःपूर्वक सांगतात — ‘यिन परिवारामुळेच मी घडत गेलो आणि लाखो युवकांचा आवाज बनू शकलो.’

हिऱ्याची पारख जोहरीलाच असते, असे म्हणतात. खासदार शरदचंद्र पवार यांनी परमेश्वर इंगोले यांच्या जिद्दीची आणि कार्याची दखल घेत, सदस्यही नसताना त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी दिली. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. त्यानंतर संभाजीनगर पक्षनिरीक्षक, कन्नड विधानसभा जिल्हा प्रभारी, वाशिम जिल्हा प्रभारी, प्रदेश सरचिटणीस अशी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत ते पक्षात सक्रिय राहिले. गेल्या दहा वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे अखंड व्रत त्यांनी जपले असून, आता ते जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा साधा मुलगा आज सामाजिक आणि राजकीय पटलावर आपल्या जिद्द, मेहनत आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर आपली ठळक मोहोर उमटवत आहे. त्यांच्या कार्याची दखल सातासमुद्रापार अमेरिकेतही घेतली गेली असून, अमेरिकेतील टोलोसा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आणि मराठवाडा रत्न पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. परमेश्वर इंगोले अनेक युवकांनी आदर्श घ्यावा असे युवा नेतृत्व आहेत.

असा हा तरुणांना प्रेरणा देणारा परमेश्वर इंगोले यांचा प्रवास. समाजसेवेचे त्यांनी बाळगलेले ध्येय सदैव यशोशिखर गाठो आणि त्यांची राजकीय वाटचालही अधिक प्रगतीपथावर जावो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
परमेश्वर इंगोले संपर्क क्रमांक
9921715103

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *