घरातील वाचनसंस्कृतीच्या संस्कारातून शब्दातील नेमकेपणा, भाषाशैली आणि संवादकौशल्य विकसित झाले. त्याला अनुभवाची आणि शिक्षणाची जोड देत उत्स्फूर्त व नैसर्गिकपणे समोरच्याला बोलतं करत विषय खुलविण्याचं कसब ज्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं आहे, अशा सर्वव्यापी मुलाखतकार म्हणून अश्विनी कोळेकर आज सर्वांच्या परिचयाच्या आहेत. ‘चित्रांगण’च्या माध्यमातून त्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, चित्रपट, अर्थ अशा सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांच्या मुलाखती अगदी दिलखुलासपणे घेत आहेत.
आई पुष्पा धायगुडे आणि नायब तहसीलदार म्हणून कार्य केलेले विजय धायगुडे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही मुलांना शिक्षणाची गोडी लावली. याच संस्कारातून अश्विनी धायगुडे–कोळेकर यांनी डी.एड., बी.एड. आणि एम.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, आत असलेली पत्रकारिता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. अनेक वर्षे त्यांनी चित्रपटांवर लेखन केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात काम करण्याची संधी मिळाली आणि ‘चित्रशारदा’ या मुखपत्राच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून त्या कार्यरत झाल्या. त्या सांगतात की, हा काळ त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. या संधीचे सोने करत ‘चित्रशारदा’च्या माध्यमातून त्यांनी प्रख्यात गायिका आशा भोसले, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विक्रम गोखले, मोहन आगाशे, लक्ष्मण उतेकर, अमोल कोल्हे यांच्यापासून ते आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, प्रतीक गांधी, अनंत महादेवन अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या.
त्यांचे सांगणे आहे की, “जर तुम्हाला गोष्टी घडाव्यात असे वाटत असेल, तर त्या घडवून आणाव्या लागतात.” याच विचारातून आपल्या पाठीशी असलेल्या अनुभवाला आणि निर्माण झालेल्या स्वतःच्या ओळखीला त्यांनी ‘चित्रांगण मीडिया सर्व्हिसेस’चा नवा आयाम जोडला. या फर्मच्या माध्यमातून त्या कंटेंट रायटिंग करतात तसेच ‘चित्रांगण’ युट्युब चॅनलही चालवतात. आपल्या लिखाणाचा परीघ विस्तारत, या युट्युब चॅनलद्वारे त्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि चित्रपट क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या मुलाखती आत्मविश्वासपूर्वक आणि दिलखुलासपणे घेऊ लागल्या.
या प्रवासात ममता सिंधुताई सपकाळ आणि डॉ. नानासाहेब थोरात यांसारख्या व्यक्तींच्या मुलाखती विशेष आठवणीच्या असल्याचे त्या सांगतात. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची मुलाखत त्यांच्या अंतरात्म्यावर खोलवर परिणाम करणारी ठरली. व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील सर्व अडचणींना मोठ्या धैर्याने तोंड देत त्यांनी ज्या ताकदीने स्वतःला सिद्ध केले, ते खरोखरच विलक्षण आणि अप्रतिम आहे, असे त्या नमूद करतात.
आणखी एक आठवण त्या प्रकर्षाने सांगतात. केदार शिंदे यांची ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका कलर्स मराठीवर सुरू होती; मात्र काही कारणांमुळे ती बंद पडली. त्या काळात अश्विनी यांनी केदार शिंदे यांची मुलाखत घेऊन ‘चित्रशारदा’ मुखपत्रात प्रसिद्ध केली होती. यावर केदार शिंदे यांनी भावपूर्ण शब्दांत पत्राद्वारे कळवले की, “ही मालिका प्रेक्षकांना फारशी रुजली नसली, तरी तुम्ही ज्या पद्धतीने तिची मांडणी करून ती जनमानसापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” हा अनुभव त्या अत्यंत भावूक होऊन सांगतात.
प्रत्येक मुलाखतीपूर्वी त्या संबंधित व्यक्तीच्या कार्याचा सखोल अभ्यास करतात आणि एक छोटीशी प्रश्नावली तयार करतात. आपल्या संवादकौशल्याच्या जोरावर आणि नेमक्या शब्दमांडणीतून त्या मुलाखत बहरवतात. म्हणूनच त्या आज एक अभ्यासू, उत्स्फूर्त आणि दिलखुलास मुलाखतकार म्हणून नावारूपाला आल्या आहेत.
पत्रकारिता करत असताना त्या सामान्यांच्या आवाज बनल्या. विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य, मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप, रुग्णसेवा, तसेच कोरोनाच्या काळात केलेले आर्थिक सहाय्य अशा छोट्या-छोट्या कामांतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. “यातून मला मोठे समाधान मिळते,” असे त्या आनंदाने सांगतात.
त्या म्हणतात की, स्पर्धा आणि घराणेशाही सर्वत्र आहे; मात्र मेहनत, स्वतःवर विश्वास आणि स्वतःवर काम करण्याची तयारी असेल, तर सर्व क्षेत्रे तुमच्यासाठी पायघड्या घालून उभी राहतात. पुढील काळात आणखी अनेक दिग्गजांच्या मुलाखती घ्यायच्या असून, चेहरा नसलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना चेहरा मिळवून द्यायचा आहे, असे त्या निष्ठेने सांगतात.
कर्तृत्ववान आणि प्रकाशझोतात आलेल्या व्यक्तींना करावा लागणारा संघर्ष समाजासमोर मांडत त्या तरुणांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत. त्यांचा हा प्रवास असाच अव्याहतपणे सुरू राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
अश्विनी कोळेकर संपर्क क्रमांक
7741827532




