1661 ला कोकण जिंकायला निघालेल्या शाहिस्तेखानाचा उजवा हात कारतलब खान याच्या 18000 सैन्यांना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी उंबरखिंडीच्या अरुंद दरीत अडकविले. दोन्ही बाजूंनी सैन्याची कोंडी करत गनिमी काव्याचे तंत्र वापरीत घोड्यावर स्वार शिवाजी महाराजांनी ही लढाई अवघ्या दोन तासांत जिंकली. कारतलब खान शिवाजी महाराजांना शरण आला आणि सैन्य सोडून निघून गेला.
जिथे शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता अशा लाल महालात केवळ 400 मावळ्यांनिशी शिवाजी महाराजांनी छापा टाकला. त्याची मुंडकी छाटणार पण त्याने उडी मारल्याने त्याची बोटे कापल्या गेली. ही घटना मुघल साम्राज्यासाठी मोठी नाचक्की होती.
अशा अनेक युद्धामध्ये आपल्या शौर्याची पराकाष्ठा दाखविणाऱ्या, हिंदवी स्वराज्यासाठी रयतेच्या सुखासाठी ज्या शिवाजी महाराजांची तलवार तळपळत होती, रक्त सळसळत होतं असे तेजस्वी, प्रखर स्वाभिमानी, पराकोटीची लढाऊ वृत्ती असलेले शिवाजी महाराज मात्र पुरंदरचा तह झाल्यानंतर सर्वस्व गमावून बसतात. 23 किल्ले त्यांना मोघलांना द्यावे लागतात मोठ्या प्रमाणात महसूल द्यावा लागतो. स्वतःचा नाऊ वर्षाचा पुत्र संभाजीला दिलेरखानाच्या छावणीत तारण म्हणून ठेवावा लागतो. घोड्यावर थाटात मिरवणारे, पालखीत मानाने बसणारे तहाच्या अटीनुसार नि:शस्त्र पायी चालत निघतात. एवढी नामुष्कीची वेळ येऊनही त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार शिवतसुद्धा नाही. त्यांच्या मनात विचार असतो तो फक्त जिंकण्याचा. किल्ले जिंकता येतील पण गेलेली माणसे परत मिळवता येणार नाही आणि त्यानंतर तीन वर्षात पुन्हा गत वैभव त्यांनी प्राप्त केले आणि 240 किल्ल्यांचे ते गडपती होतात.
आपल्या खणखणत्या आवाजात, हजारो शिवभक्तांचे रक्त सळसळायला लावणाऱ्या प्रभावी आणि चिकित्सक वक्तृत्व शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक एक प्रसंग जसाच्या तसा समग्र पद्धतीने उभा करीत शिवाजी महाराजांची जाज्वल्य देशभक्ती, प्रखर धर्माभिमान, त्यांची युद्धनीती, प्रशासकीय धोरण, धीरोदात्त स्वभाव, माणसांना जोडण्याची कला, पर्यावरण प्रेम या गुणांची ओळखच नाही तर ही मूल्ये रुजवून राष्ट्र उभारणीचे मोठे कार्य आयुर्वेदिक चिकित्सक, योग तज्ञ, हिंदी परिवाराचे संस्थापक शिवरत्न शेटे देशभरात करीत आहेत.
संस्कारक्षम वयामध्ये शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाज, गड आला पण सिंह गेला यासारखे अतुल्य पराक्रमाची चेतना निर्माण करणारे कार्यक्रम पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांविषयी डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मनामध्ये विलक्षण ओढ निर्माण झाली. उपजत असलेल्या पहाडी आवाजात त्यांनी पोवाडे गाण्यास सुरुवात केली. सोबतच शालेय जीवनात असताना त्यांनी अनेक वत्कृत्व स्पर्धा गाजविल्या आणि किल्ले भ्रमंती सोबतिला होतीच.
या त्रिवेणी संगमातून शिवचरित्र त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने भिनले आणि ते मोठ्या अभिमानाने सांगतात जन्म कुठे घ्यायचा आपल्या हाती नसतं पण अनेक राज्य असलेल्या भारतासारख्या देशात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म व्हावा ही मोठी पुण्याची गोष्ट आहे. ज्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती माती कपाळाला लावण्यात ऐवजी माथी भडकवणारी वक्तव्य आता होत आहेत. आज लहान मुलांपासून तर वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वच स्त्रिया असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. नात्यातील स्नेहभाव नष्ट होत आहे. पक्षनिष्ठा उरली नाही. तेव्हा देशाभिमान आणि धर्म संस्कृतीचे रक्षण करून तरुणांची पिढी निर्माण केली पाहिजे या एकाच प्रेरणेने डॉ. शिवरत्न शेटे अव्वल संदर्भ देत शिवचरित्र जनमानसांमध्ये उतरवित आहेत.
आपल्या व्याख्यानातून ते धर्माविषयी प्रखर अभिमान बाळगणारे शिवाजी महाराज तेवढेच इतरांच्या धर्माविषयी संवेदनशीलता बाळगणारे होते, आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी महाराज घेतील ही निष्ठा त्यांच्या मावळ्यांमध्ये होती आणि त्यामुळेच ते महाराजांसाठी प्रसंगी प्राण द्यायला सुद्धा तयार होतात . त्यांचे स्त्री-दक्षिण्य आणि आपल्या मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची करण्यात येणारी योग्य दखल, अशा शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगांची उदाहरणे प्रभावीपणे देतच नाहीत तर समोर बसलेल्या प्रत्येक शिवभक्ताच्या रक्तामध्ये ते स्फुरण निर्माण करतात.
यातून अनेक तरुणांना प्रेरणा आणि चेतना मिळाली आहे आणि ते त्यांच्याशी जुळले गेलेले आहेत.
याशिवाय शिवाजी महाराजांचा प्रत्येक गड किल्ला हा आपल्या दृष्टीने तीर्थस्थळच असतो. हे गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. हिंदवी परिवार संस्थेच्या मार्फत तीन दशकांपासून ऊन, पाऊस, वारा या कशाचीही तमा न बाळगता शालेय विद्यार्थ्यांपासून तर वृद्धांपर्यंत गड भ्रमंती करत आहेत. या त्यांच्या गडभ्रमंतीमध्ये राजीव खांडेकर, पद्मश्री पोपटराव पवार पासून अनेक दिग्गज शामीन झाले असून, पुस्तकातून शिवाजी महाराज समजविण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा शिवभक्तापर्यंत पोहोचवितात
एक व्यक्ती आपल्या अल्प आयुष्यात काय काय करू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण असलेले डॉ. शिवरत्न शेटे यांनी आयुर्वेद या भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि इतिहास या विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील आणि सध्या अवघ्या विश्वाने स्वीकारलेला योग हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे या विषयातही अभ्यास करून त्यांनी विशेष प्राविण्य मिळविलेले आहे . या प्रत्येक ज्ञानशाखेतील सर्वोत्तम गोष्टी ते आपल्या भोवतालच्या प्रत्येकाला अतिशय मनापासून देत आहेत. सोलापूर मधील शिवसह्याद्री आरोग्यधाम हा तर त्यांचा आगळावेगळा प्रयोग आहे. या प्रयोगातून महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या सह्याद्री इतकीच त्यांच्या मनाची विशालता दिसून येते.
शिवरायांचा देव, देश आणि धर्म ही त्रि सूत्री त्यांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनात उतरविली आहे. शिवसह्याद्री आरोग्यधाममध्ये देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या कुटुंबीयांना सर्व सुविधा निशुल्क उपलब्ध करून देत आहेत. देशाच्या अनेक भागांतून दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण येथे पूर्णपणे बरे झालेले आहेत.याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो रुग्णांना ते विनामूल्य चिकित्सासह आयुर्वेदिक औषधेही देत आहेत. त्यांच्या या उपचारात्मक सेवेचे अनेक रुग्ण लाभ घेत आहेत.
एक इतिहास अभ्यासक, उत्तम वक्ता, आयुर्वेद शास्त्राचा गाढा अभ्यासक, योगशास्त्राचा पथिक अशा विविध भूमिकांमध्ये वावरताना त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता ही सतत सजग असतो. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी आपल्या शिलेदारांसह धाव घेतली आणि अवघ्या सात दिवसात 26 आरोग्य शिबिरे घेतली. गरजूंना सुमारे 15 लाखांची औषधे विनामूल्य वितरित केली. त्यांच्या जाणीवा किती प्रगल्भ आहेत हेच यातून दिसून येते. या क्षेत्रातील कर्तबगारिमुळेच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने उभ्या भारतातून निवडलेल्या चार तज्ञांमध्ये सन्मानपूर्वक त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉ.शिवरत्न शेटे हे आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वामी विवेकानंद पुरस्काराचे धनी झाले आहेत. याशिवाय अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहे.
ते सांगतात की शिवाजी महाराजांना आपण बघितले नाही पण त्यांच्या शौर्याची गाथा सांगणारे, त्यांच्या दुर्दम्य साहसाचे प्रत्यक्ष साक्षीदार हे गडकोट आणि किल्ले आहेत. त्यांची आता पडझड झालेली आहे. तेव्हा शासनाने शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर ज्वलंत उभा करण्यासाठी या गड, किल्ले व परकोटांची उभारणी करण्याची गरज आहे. ते म्हणतात की शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे आरमार, जलतज्ञ, पर्यावरण, सहिष्णुता, धर्माभिमान, प्रशासकीय धोरण, मानव संसाधन तंत्र शिकविणारे व्यक्तिमत्व विकासाचे पुस्तकच आहे तेव्हा नव्या पिढीने त्यांच्या विचारांचे आचरण करावे असा मोलाचा सल्ला ते नव्या पिढीला देतात.
शिवचरित्रातून राष्ट्रउभारणीचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडत आहेत. त्यांचे हे चिरंतन कार्य अखंड सुरू राहो यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा.





