अवकाळीचा फटका !

सध्या महाराष्ट्रावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी आहे. भारतातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा एकूण हवामान बदलामुळे संकटांची परंपरा सुरू आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. हा फटका शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. आताच्या ताज्या पावसाच्या माऱ्यामुळे जवळजवळ फळबागा आणि शेतात उभ्या असलेल्या पिकांची जबरदस्त हानी झालेली दिसते. आधीच शेतकऱ्यांना भाव मिळत नाही.

भाजीपाला, सोयाबीन, कांदे, बटाटे आणि आता गहू या सर्वांच्या भावात कमालीची घट झालेली आहे. आताच्या परिस्थितीत शेतात जी जी पिके उभी आहेत, त्यांच्या हानीची कल्पनाही करणे कठीण आहे. कुठे जबरदस्त पाऊस, कुठे वादळी हवा, या सर्वांमुळे आम्ही वर म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक त्रास बिचाऱ्या शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. पिकांची खात्री नाही, भावाची खात्री नाही, नुकसानीच्या भरपाईची खात्री नाही. यामुळे सर्वत्र येणारे संकट महाभयानक असेल हे स्पष्ट दिसत आहे. आज भारतातील कारखानदारी रसातळाला गेलेली आहे.

चीनच्या आयातीवर आपला बाजार पूर्णपणे अवलंबून आहे. यामुळे जीडीपीस मोठे सहाय्य करणाऱ्या शेतीच्या उत्पन्नावर असाच परिणाम होत गेला तर भविष्यकाळ कठीण आहे, हे समजून घेतले पाहिजे. आताच भविष्यकाळाची चिन्हे दिसू लागली आहेत. देशातील नद्या कोरड्या पडल्या आहेत. जंगलतोड एवढी भयानक आहे की वनसंपदा खालच्या पातळीवर जात आहे. जी महाभयानक वृक्षतोड होते त्यामुळे वनराई दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत अवकाळी येणारा पाऊस आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. सरकार तरी किती मदत करणार हा प्रश्नच आहे. थोडेसे काही झाले की आपण सरकारकडे डोळे लावतो. सरकारने मदत करणे हे सरकारचे कामच आहे. पण सरकारजवळ तरी पैसा कुठे आहे.

एकेकाळचे शिलकीचे राज्य आज ७ लाख कोटी रुपये कर्जाच्या ओझ्याखाली आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर सरकारच्या उत्पन्नापैकी ९० ते ९४ टक्के खर्च कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनवर करावा लागेल. अशा परिस्थितीत अवकाळी पावसासारख्या प्रसंगांना मदत देण्याकरता काय योजना आखावी लागेल किंवा काय करावे लागेल याचा विचार न केलेलाच बरा. आताच्या या अवकाळी पावसामुळे संकटांचे ढग उभे झालेले आहेत.

सरकारला यातून मार्ग काढावाच लागेल. पण आपण पर्यावरणाचे जे नुकसान केले आहे त्यामुळे भविष्यकाळातील समस्या भयानक असणार आहेत. समुद्राची पातळी वाढणार आहे. यामुळे अनेक महानगरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. विदर्भासारख्या अधिक तापमान असणाऱ्या विभागाला अधिक कष्ट होणार आहेत.

या सर्व परिस्थितीत आपल्याकडील पिकांची भविष्यकाळातील आखणी करावी लागेल. याचा अंदाज आता तरी येणार नाही. शेतकरी संकटात असताना त्याचा परिणाम बाजारपेठेवरही होतो. आताच्या घडीला शेतकरी म्हणा किंवा मजूरवर्ग म्हणा यांची खरेदी आपोआप कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यकाळातील समस्यांचा मुकाबला करणे याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

या बाबीवर तात्पुरता उपाय योजून प्रश्न सुटणार नाही. आमच्या राजकारण्यांना परस्परांवर दुगाण्या झाडण्यास वेळ मिळतो. यावर तत्पुरती मलमपट्टी करून काम भागवण्यात येते. अशा स्थितीत या अवकाळी पावसाचा फटका कसा झेलता येईल यावर सर्व संबंधितांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि हा विचार स्थायी स्वरूपात झाला पाहिजे. तात्पुरती सोय झाली तरी दीर्घकालीन धोरण आखले पाहिजे, हाच या अवकाळीचा संदेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *