नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व माय नागपूर एॅपवर मतदान केद्र तात्काळ शोधता येणार आहे. यासंदर्भात या डीजीटल प्लॉटफॉर्मवर मनपाने आपले मतदान केंद्र ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आज पत्रकारांना माहिती देताना मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या सुविधेबद्दल सविस्तर माहिती दिली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत शहरातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे काही मतदारांचे मतदान केंद्र बदलण्याची शक्यता आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ किंवा संभ्रम राहू नये, यासाठी मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने डीजीटल प्लॅटफॉर्म विकसित करून विविध डीजीटल प्लॉफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मनपाचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे यांच्या नेतृत्वात ही सुविधा विकसित केली आहे.
यात मतदारांना मतदार ओळखपत्रावर असलेले नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (ईपीआयसी) नुसार शोधता येणार आहे. मतदाराला मराठी किंवा इंग्रजी भाषेचा नाव शोधण्यासाठी उपयोग करता येणार आहे. मतदारांनी ईपीक क्रमांकानुसार मतदान केंद्र शोधल्यास अधिक अचूक व तात्काळ माहिती मिळू शकेल, असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी केले.
मतदारांनी ईपीक क्रमांक(वोटर आयडी) किंवा नाव नोंदल्यानंतर मतदारांना मतदाराचा प्रभाग क्रमांक टाकावा लागणार आहे. या माहितीची नोंदणी डीजीटल प्लॉटफॉर्म केल्यानंतर त्याखाली सर्च माय बूथ पर्याय उपलब्ध राहिल. यावर क्लिक केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राचे नाव दिसून येईल. तसेच त्याठिकाणी ईपीक क्रमांकाचा देखील पर्याय दिसून येईल. दोन्ही पर्यायांपैकी एक जरी पर्याय निवडल्यावर लगेच दुसऱ्या ठिकाणी मतदारांना मतदान केंद्र नेमके कुठे आहे, याचा नकाशा शोधण्यासाठी एॅरो दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राचा नकाशा दिसून येईल, तसेच आपल्या घरापासून मतदान केंद्र गाठण्यासाठी नेव्ही गेटर च्या सहाय्याने मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचता येईल. नेव्हीगेटरची सुविधा कुणालाही शेअर सुद्धा करता येणार आहे.
चॅटबॉटच्या सहाय्याने या सुविधेचा मतदारांना लाभ घेता येणार आहे. यासाठी व्हाट्सएपमध्ये 7397807397 हा क्रमांक नोंदवावा लागेल.
कसे शोधणार मतदान केंद्र
१. मनपाचे संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in
२. यावर आपले मतदान केंद्र ही विंडो आहे.
३. यावर क्लिक केल्यानंतर नावानुसार किंवा मतदार ओळखपत्राच्या ईपीक क्रमांक नोंदवावा
४. त्याखाली मतदारांनी प्रभाग क्रमांक नमूद करायचा.
५. यानंतर मतदाराला मतदान केंद्र दिसून येईल.
६. याचवेळी डिटेल असा पर्याय उपलब्ध राहील.
७. यावर क्लिक केल्यानंतर मतदान केंद्राचा नकाशा दिसून येईल.




