माणूस कितीही मोठा झाला, कितीही पदं भूषवली, तरी त्याच्या मनाच्या कुठल्यातरी hकोपऱ्यात गावाची ओढ कायम जिवंत असते. लहानपणीची माती, त्या मातीतील माणसं, बोलीभाषेचा गोडवा आणि ओळखीची नाती,या सगळ्यांची एक अदृश्य दोरी आयुष्यभर आपल्याला गावाकडे ओढत राहते. अनेकांच्या मनात एक सुप्त स्वप्न असतं, आपण गावासाठी काहीतरी उभं करावं, पंचक्रोशीसाठी काहीतरी देऊन जावं, आणि सेवानिवृत्तीनंतर तर गावाच्या गळ्यातलं ताईत बनावं.
हीच भावना मनाशी बाळगून एक सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा आपल्या गावाकडे परततो. पण तो केवळ निवांत आयुष्य जगण्यासाठी नाही, तर गावाचं, पंचक्रोशीचं आणि त्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचं सामाजिक चित्र बदलण्यासाठी. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे, प्रल्हाद होगे पाटील. प्रल्हाद होगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत विविध जबाबदाऱ्या सांभाळत प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवला. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना तळागाळातील माणसाला न्याय मिळावा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांपर्यंत सर्वसामान्यांचा पोहोच वाढावा, यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. छगन भुजबळ यांचे सचिव म्हणून काम करतानाही त्यांनी संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला.
अवघ्या राज्यात गावपातळीवरचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसावा, यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेली कामं आजही उदाहरण म्हणून सांगितली जातात. अनेक विकासाभिमुख योजनांचे शिल्पकार म्हणून प्रल्हाद होगे पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. अधिकारी असताना त्यांनी सामाजिक कारणांसाठी, नव्या उपाययोजनांसाठी आणि दूरदृष्टीने आखलेल्या प्रयोगांसाठी आपली ऊर्जा झोकून दिली.
सेवानिवृत्तीनंतर अनेक जण शांत आयुष्याची वाट निवडतात. पण प्रल्हाद होगे पाटील यांनी सेवानिवृत्तीला विश्रांती न मानता, नव्या सामाजिक प्रवासाची सुरुवात मानली. परभणी जिल्ह्यातील त्यांच्या झरी या गावी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील चार वर्षांत त्यांनी एक क्षणही शांत बसणं स्वीकारलं नाही.
मराठवाड्यातील मागास भागांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतीतील नव्या प्रयोगांची माहिती दिली, प्रशिक्षण दिलं आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास दिला. झरी हे गाव केंद्रबिंदू न ठेवता त्यांनी महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये शेतीविषयक प्रयोग यशस्वी कसे करता येतील, यासाठी मार्गदर्शन केलं. पाटील यांचे काम झरी ते मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्र असे पोहचले आहे.
प्रल्हाद पाटील यांनी सुरुवात स्वतःच्या शेतापासून केली. फळबाग लागवड, विषमुक्त शेती, पर्यावरणाचा समतोल राखणारी शेती, या सगळ्या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या शेतातील प्रयोगांची चर्चा लवकरच पंचक्रोशीबाहेर पोहोचली. अनेक शेतकरी हे प्रयोग पाहण्यासाठी झरीला येऊ लागले.
एक प्रयोग, मग दुसरा, आणि अशा अनेक प्रयोगांतून त्यांनी हे सिद्ध केलं की कमी जमिनीतही दर्जेदार उत्पादन घेता येतं. नैसर्गिक आपत्ती, कर्ज आणि अपयशाच्या छायेत वावरणारा शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा उभा राहू लागला. शेती केवळ पोट भरण्याचं साधन न राहता, सन्मानाचं आणि आत्मविश्वासाचं क्षेत्र बनू लागली.
पण पाटील इथेच थांबले नाहीत. उत्तम शेतीसोबत उत्तम पिढी घडणं आवश्यक आहे, हा विचार त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना त्यांनी सातत्याने सांगितले. मुलांना शिक्षणाकडे वळवा. विशेषतः मुलांच्या भाषा, शब्दलेखन आणि आकलनक्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. केवळ मार्गदर्शन करून न थांबता, प्रत्यक्ष त्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची वाट दाखवताना त्यांनी आर्थिक, मानसिक आणि नैतिक आधार दिला. वारंवार अपयश आलेल्या, दिशाहीन झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून पुन्हा उभं केलं. दहावी-बारावीच्या मुलांना गाव सोडायची भीती वाटते, हे ओळखून त्यांनी त्या मुलांचं समुपदेशन केलं, त्यांना बाहेरचं जग दाखवलं. एकदा जगाची ओळख झाली की, त्यांच्या आवडी-निवडींना नवी दिशा मिळाली.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांनी सातत्याने शाळांना भेटी दिल्या. विविध प्रयोग राबवले, ज्यामुळे त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आपली शाळा आपलीच आहे अशी भावना निर्माण झाली. गाव आणि परिसरात सतत विकास व्हावा यासाठी पाटील यांनी घेतलेली भूमिका एक इतिहास झाली आहे.
प्रल्हाद पाटील ठामपणे सांगतात, शेतकरी आमचा राजा आहे. पण या राजाला केवळ गौरवाच्या शब्दांनी नाही, तर योग्य दिशादर्शनाने, काळानुरूप बदल स्वीकारण्यास मदत करून साथ द्यावी लागते. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी खचतो; अशा वेळी त्याच्या पाठीशी उभं राहणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तेच सेम तरुणाईच्या बाबतीत आहे. त्यांना आधार आणि दिशा दिली तरच समाजाला दिशा मिळेल.
पाटील यांनी ही जबाबदारी केवळ शब्दांत नाही, तर कृतीतून निभावली. या सामाजिक प्रवासात पाटील यांच्या पत्नी चंदा पाटील यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनाही सामाजिक कार्याची प्रचंड आवड असून, नवनवे उपक्रम राबवण्याची त्यांची सततची धडपड असते. हीच संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव त्यांच्या मुलगा-मुलगी यांच्यातही उतरलेली दिसते.
जेव्हा सामाजिक कार्याचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, तेव्हा तो केवळ उपक्रम राहत नाही, तो इतिहास घडवतो. प्रल्हाद होगे पाटील यांचा दीर्घ प्रवास हा समाजसेवेच्या मुकुटाला नवे तेज देणारा आहे. त्यांनी शेतीसाठी केलेलं काम, शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार, आणि माणुसकीच्या आधारावर उभं केलेलं सामाजिक जाळं, हे सारं पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील. एक सुशिक्षित, अनुभवी माणूस समाजासाठी काय निर्माण करू शकतो आणि ती निर्मिती शेकडो वर्षे टिकू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रल्हाद होगे पाटील. समाजासाठी अखंड लढत राहणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव इतिहासात अग्रक्रमाने घेतलं जाईल, याबद्दल कोणतीही शंका नाही. त्यांनी झरी मराठवाडा, राज्य एवढे सिमीत राहता अजून पुढे भारतभर भरारी घ्यावी. त्यांचा आदर्श घेऊन अनेकांनी पुढाकार घ्यावा. पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.





