ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन
भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे ७ जानेवारीला रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉ.गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शात्रज्ञ देशाने गमावला आहे. डॉक्टर माधव गाडगीळ हे भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर नाव होते. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला.
अंबरनाथमध्ये १२ काँग्रेसच्या नागरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अंबरनाथ महानगरपालिका निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले होते. आता या राजकीय नाट्याचा दुसरा प्रसंग रंगला असून, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना आता भाजपने प्रवेश दिलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्यासह इतर नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. याची गंभीर दखल घेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र या कारवाईला न जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला आहे.
संभाजीनगरमध्ये शिवसेनेमुळे युती तुटली, देवेंद्र फडणवीस
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी संभाजीनगरच्या विकासासाठी करण्यात आलेल्या योजना तसेच निधीच्या तरतुदीबद्दल माहिती दिली. तसेच शहराच्या विकासाचे नवे व्हिजन मांडले. यावेळी त्यांनी ना आन ना बाण आता फक्त भगव्याची शान अशी घोषणा केली. येथील युती फक्त शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमुळे तुटली असा दावा त्यांनी केला. यावेळी खड्डेमुक्त रस्ते, पाण्याचा प्रश्न, औद्योगिक विकास, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर यावर आराखडा आणि विकासनिधी यावर भाष्य केले.
तर राजकारणातून सन्यास घेईल, मुरलीधर मोहोळांचे खुले आव्हान
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड निलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आला होता. अजित पवारांनी देखील मोहोळ यांच्यावर टीका केली होती. आता स्वतः मोहोळ आता आक्रमक पवित्र घेतला आहे. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध करून दाखवा जर ते सिद्ध झाले तर आजच राजकारणातून सन्यास घेईल असे थेट आव्हान मोहोळ यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत आमने सामने, सौहार्दपूर्ण बातचीत
मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना घडली. मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमादरम्यान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत हे समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे हे दोघे सौहार्दपूर्ण वातावरणात भेटल्यामुळे निवडणूक काळात या प्रसंगाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
अमरावतीत महायुतीमध्ये बिघाडी
अमरावती महापालिकेत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना राजकारणातील वेगवेगळे रंग अनुभवायला मिळत आहेत. नवनीत राणा या एकीकडे भाजपचा प्रचार करीत असताना दुसरीकडे आपल्या पतीच्या पक्षाच्या प्रचारासाठीही सभा घेत आहेत. यावरून भाजप खासदार अनिल बोन्डे यांनी नवनीत राणा
यांच्यावर टोला लगावला. यानंतर नवनीत राणा यांनी त्यांच्यावर पलटवार केला. बटेंगे तो कंटेंगे या घोषणेचा सांदर्भ देत सुरु झालेली हि चर्चा एकमेकांच्या निष्ठेपर्यंत जाऊन पोहोचली.
सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड नाही, एकनाथ शिंदे
अंबरनाथ येथे झालेल्या भाजप काँग्रेस आघाडीबाबत आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांचेशी बोललो. जे होतंय ते विचारसरणीशी सुसंगत नाही याची जाण करून दिली . हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड करीत नाही. असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. सोबत आरसाही दाखवला
आहे. मुंबईत आजतक वृत्तवाहिनिच्या मुंबई मंथन या कार्यक्रमाच्या मंचावरून ते हल्लाबोल करीत होते.
बांगलादेशी घुसघोर आणि रोहिंग्या मुस्लिमांना मुंबई सोडण्याचा इशारा
भाजप नेते नितेश राणे यांनी कांदिवली येथील जाहीर सभेत बोलताना अत्यंत आक्रमक पवित्र घेत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लिमाना मुंबई सोडण्याचा थेट इशारा दिला आहे. मी सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही, राष्ट्रवादी विचारांचे मुस्लिम आमच्या सोबत आहेत. पण कोणाला ठोकायचे हे मला चांगले माहित आहे. १५ तारीख याद राखा आणि आपल्या बॅगा भरून ठेवा . १६ तारखेनंतर एकही बांग्लादेशी किंवा रोहिंग्या मुंबईत दिसणार नाही. असे नितेश राणे म्हणाले. त्याच्या या भाषणामुळे मुंबईतील राजकारण पुन्हा तापले आहे.
मराठीच्या अस्मितेसाठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र, राज ठाकरे
जुने वाद विसरून मुंबईच्या अस्तित्वासाठी आणि मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी एकत्र येणे गरजेचे होते असे विधान राज ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या संयुक्त मुलाखतीत दिले. या मुलाखतीचे संचालन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचा उल्लेख केला कि मुंबई महापालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. जर असे असेल तर ५०_ ५० कोटी रुपयांसाठी पक्ष बदलण्यावची गरज का भासली. असा थेटसवाल राज ठाकरे यांनी केला.
अर्ज फेटाळलेल्या इच्छुक उमेदवारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
पुढील आठवड्यात अर्ज फेटाळल्या गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आता उच्च न्यायालयाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध कारणांनी बाद ठरविण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने यावर शुक्रवारी निर्णय घेण्याचे ठरविले आहे.




