टॉप स्टोरी महाराष्ट्र

एका मंचावर येणार सर्व कट्टर विरोधक; ‘दादां’साठी अखेर राजकीय वैर विरघळणार?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाल्यानंतर आता त्या अष्टपैलू लोकनेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी संपूर्ण राज्य एकवटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असतानाच, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सभेच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे नेते एकाच व्यासपीठावर येणार असून, ‘दादां’साठी ते आपले वैयक्तिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवणार आहेत.

येत्या सोमवारी, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे सायंकाळी ५ वाजता या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे सर्वात मोठे कुतूहल म्हणजे, येथे केवळ ठराविक आणि निवडक नेत्यांनाच भाषणाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या सत्ताधारी नेत्यांसोबतच; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख विरोधी नेतेही आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांनाही या शोकसभेत बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सामान्यांच्या हक्कांसाठी झटणारा आणि दिलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाळणारा ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेला उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे नम्र आवाहन शोककुल सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे. राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्राचे दिग्गज नेते आपल्या या सहकाऱ्याबद्दल काय बोलतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *