काँग्रेसचे ८५ वे अधिवेशन नया रायपूर येथे पार पडले. तीन दिवसांच्या या अधिवेशनात काँग्रेसने कात टाकली काय, काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीत काही बदल होणार काय, काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी काय काय करावे लागेल अशा सारख्या अनेक प्रश्नांचा विचार झाला. आजच्या घडीला ‘अदानी’चा मुद्दा सर्वच स्तरावर चर्चिला जात आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजला नसता हे शक्यच नाही. हे अधिवेशन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर होत असलेले अधिवेशन आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकाजर्ुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींची बहीण प्रियंका गांधी यांनी तर राहुल गांधी यांचा गौरवाने उल्लेख केला. पण अधिवेशनात ज्यांची ज्यांची भाषणे झाली त्या सर्व प्रमुख नेत्यांनी काँग्रेसचे भावी नेते राहुल गांधीच आहेत हे अधोरेखित केले. खुद्द राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अनेक भावनिक मुद्दे बोलून दाखविले. आपल्या मालकीचे देशात घर नाही, याचा त्यांनी आवजर्ून उल्लेख केला. देशातील विविध समस्यांवर शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य व्यापाऱ्यांपासून इतर समस्यांवर केवळ टिकाच केली नाही तर मार्गही दाखविला.
भारतीय जनता पक्षानंतर आजच्या घडीला देशव्याप्त पक्ष म्हणून काँग्रेसचेच स्थान आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढाकार घेऊन पुढील निवडणुकीत विरोधी पक्षांचे ऐक्य करावे लागेल, ही जाहीर घोषणा काँग्रेस बदलल्याचे निदर्शक आहे. तिसरी आघाडी करणे भारतीय जनता पक्षाच्या फायद्याचे आहे, याचा उघडउघड उल्लेख करण्यात आला. म्हणजे यापुढे काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी इतर विरोधी पक्षांचा प्रभाव आहे त्या त्या ठिकाणी त्यांना संधी देईल, असे समजावे काय हाही सवाल आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पश्चिम बंगालच्या देण्यात येऊ शकते. कोणेएकेकाळी ममता बॅनर्जी काँग्रेसच्या नेत्या होत्या. काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला कंटाळून त्यांनी आपला पक्ष काढला. डाव्या पक्षाची सत्ता उलथवून लावली.
आजच्या घडीला बंगाली मतदारास काही तुरळक ठिकाणे वगळली तर काँग्रेसला फारशी आशा नाही. थोडक्यात मूळच्या काँग्रेसी ममता बॅनर्जी यांच्याशी युती होईल काय हा प्रश्न आहे. तिकडे आंध्रमध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्या पुत्राला डावलल्यामुळे आंध्र प्रदेशातून काँग्रेसचे अस्तित्व जवळजवळ संपलेले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन मोठ्या राज्यांत काँग्रेसची भूमिका काय राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. पण शिवसेनेने वंचित आघाडी, आम आदमी पक्ष यांच्यासारख्या पक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. ज्या ज्या राज्यात काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सरळ सामना आहे, अशी फार कमी राज्ये उरली आहेत.
कर्नाटकात काँग्रेस कितीही प्रभावी बसली तरी देवेगौडा यांचा पक्ष दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. नेहमीप्रमाणे निवडणुकीपूर्वी ऐक्याच्या लंब्याचौड्या बाता आणि ऐन निवडणुकीपूर्वी या ऐक्याला तिलांजली हा स्वतंत्र भारताचा इतिहास राहिला आहे. याचा फायदा बरीच वर्षे काँग्रेसला मिळाला, आता तो भाजपला मिळणार आहे. दहा वर्षे सत्तेत राहिल्यावर पुढील दहा वर्षे ही काँग्रेसच्या उतरणीची वर्षे आहेत, हे काँग्रेस नेत्यांनी मान्य केल्याचे दिसते. पक्षाची अधिवेशने मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली ठरू शकतात. पण हा प्रभाव टिकविणे आणि काँग्रेसच्या बाबतीत इतर पक्षांशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपसातील फाटाफुटीमुळे पंजाब हातचा गेला.
आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे गुजरातेत काँग्रेसचे पार पानिपत झाले. अशा स्थितीत काँग्रेस पक्ष मोठा पक्ष असला तरी थोडी नमती भूमिका घेऊन इतर पक्षांबरोबर आघाडी करणे त्यांना जमेल काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अदानी प्रकरणाचे कोलीत भारतीय जनता पक्षाला अतिशय त्रासदायक ठरू शकते. अदानी प्रकरण भाजपसाठी इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारचे आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रभावशाली भाषणकला या सर्व संकटातून भारतीय जनता पक्षाला तारून नेईल, अशी भाजप कार्यकर्त्यांची खात्री आहे. ते काही असले तरी गलितगात्र झालेल्या काँग्रेसला सध्या नाही म्हटले तरी सुगीचे दिवस आले आहेत. भारतीय जनता पक्ष दोन वरून तीनशे वर गेला याचे उदाहरण देऊन काँग्रेसचा आशावाद फलदायी होईल, अशा भ्रमात काँग्रेसने राहू नये. पण रायपूरचे अधिवेशन काँग्रेसमधील बदलाचे चिन्ह आहे, एवढे मात्र खास.