काठमांडू, दि.२६। वृत्तसंस्था नेपाळमध्ये दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पुष्प कमल दहल यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आरपीपी) चार मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. वास्तविक, प्रचंड यांच्या सरकारने आघाडीतून बाहेर पडून विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ठठझ च्या मंत्र्यांनी शनिवारी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या पक्षाने अद्याप अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. जर असे झाल्यास “प्रचंड’ यांचे सरकार संकटात येऊ शकते. नेपाळच्या संसदेत २७५ जागा आहेत. त्यापैकी आरपीपीकडे १४ जागा आहेत. यासोबतच हा पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे.
शनिवारी नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने ४ मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. मात्र, सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे आरपीपीचे नेते लिंगडेन यांच्याकडे ऊर्जा, जलसंपदा आणि सिंचन ही महत्त्वाची खाती होती. उपसभापती विक्रम पांडे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय तर नेते ध्रुव बहादूर प्रधान यांच्याकडे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज मंत्रालय होते. तसेच दीपक बहादूर सिंग हे सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री होते.
दुसरीकडे नेपाळी काँग्रेसचे नेते रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे राष्ट्रपती होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे नेपाळी काँग्रेस, सीपीएन- माओवादी केंद्र, जनता समाजवादी पार्टी आणि सीपीएन पार्टीसह आठ पक्षांची नवीन युती आहे. नेपाळमध्ये ९ मार्च रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. येथे राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. एखादी व्यक्ती केवळ २ वेळा राष्ट्रपती पदावर निवडून येऊ शकते.