चंद्रपूर, दि.२६। प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. त्यांना येणाऱ्या काळात आणखी साईडलाईन करण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्याच गोटातून याबाबत चर्चा ऐकल्याचेही खैरे म्हणाले. नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान, राज्याच्या विविध भागात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. मराठवाड्यातील नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खैरे आजपासूनच विदर्भाच्या दौऱ्यावर असून शिवगर्जनेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे यांनी नितीन गडकरींबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार आम्ही शिवसंवाद यात्रा करत आहोत. मी गडचिरोलीचा दौरा करणार आहे. प्रत्येकाला ४-४ जिल्हे देण्यात आले आहेत. गडचिरोलीशी माझा चांगला परिचय आहे. मात्र महाराष्ट्रात आज वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमचे ४० गद्दार भाजपला सहभागी झाले आणि आपली चूल पेटवली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आता ओवैसींना जाऊन मिळतील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलता येत नाही. आम्ही लाचार नाही की ओवैसींना जाऊन भेटू. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे.
बावनकुळे यांनी थोडे सांभाळून बोलायला हवे, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी दिला. चंद्रकांत खैरे म्हणाले, आम्ही एनडीएत होतो. मोदीजी त्यावेळी पंतप्रधान होते. तेव्हा भाजपच्या एकाही मंत्र्याला काम करण्याचा अधिकार नव्हता. नितीन गडकरी यांना काही काम सांगितले तर ते करायचे. त्यांच्याकडे मी जिल्ह्याचे एक काम घेऊन गेलो होतो. पाच सहा महिन्यानंतर परत लोकसभेत विचारले कामाचे काय झाले? काम सुरू झाले नव्हते.