माद्रीद, दि.२७। वृत्तसंस्था आइल ऑफ मॅन देशाच्या संघाने -२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विेशविक्रम केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी, स्पेन विरुद्धच्या ६ टी- २० मालिकेतील शेवटच्या सामन्यात, संपूर्ण संघ ८.४ षटकात केवळ १० धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात स्पेनने ०.२ षटकांत एकही विकेट न गमावता १३ धावा करून सामना जिंकला. स्पेनने मालिका ५-० ने जिंकली. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरच्या नावावर होता. २०२२-२३ हंगामात, सिडनी संघ एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध १५ धावांत गारद झाला होता. आइल ऑफ मॅनचे ७ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. जोसेफ बुरोजने सर्वाधिक ४ धावा केल्या. स्पेनकडून आतिफ महमूद हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ४ षटकांत ६ धावा देत ४ बळी घेतले. त्याच्या दोन ओव्हर मेडन्सही होत्या. त्याच्याशिवाय मोहम्मद कामरानने ३ आणि लॉर्न बर्न्सने २ बळी घेतले. आइल ऑफ मॅनने टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा तुकर्ीचा विक्रमही मोडला. चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये, तुकर्ीचा संघ इल्फोव्ह काउंटीमध्ये झेक प्रजासत्ताकविरुद्ध २१ धावांत सर्वबाद झाला होता. त्याच वेळी, आइल ऑफ मॅनची मागील सर्वात कमी धावसंख्या ६६ धावा होती, जी त्याने २५ फेब्रुवारी रोजी ६ सामन्यांच्या मालिकेतील ५ व्या सामन्यात स्पेनविरुद्ध केली होती.
आइल ऑफ मॅनने स्पेनविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना ८१ धावांनी गमावला. दुसरा सामना पावसामुळे रद्द केला गेला. तिसरा सामना स्पेनने ८ गडी राखून आणि चौथा सामना ६ विकेटने जिंकला. पाचव्या सामन्यात स्पेनने ७ गडी राखून विजय मिळवला. स्पेनने सहावा आणि शेवटचा सामना १० गडी राखून जिंकला. आइल ऑफ मॅनने आतापर्यंत १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ८ मध्ये विजय मिळवला होता आणि ७ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. एका सामन्याचा निकाल लागला नाही. संघाने सायप्रसविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले, तर त्यांनी एस्टोनियाला दोनदा पराभूत केले. रोमानिया, सर्बिया आणि तुकर्ी यांचाही प्रत्येकी एकदा पराभव केला आहे.