वॉशिंग्टन, दि.२७। वृत्तसंस्था चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार झाला, असे अमेरिकेने गुप्तचर अहवालाचा हवाला देत म्हटले. सोमवारी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने विषाणूशी संबंधित अंतिम अहवाल सादर केला. विषाणूची उत्पत्ती माहित नाही, परंत हा विषाणू वुहान लॅबमधून पसरल्याची शक्यता आहे, असे उर्जा विभागाने यापूर्वी सांगितले होते. ऊर्जा विभागाचे अधिकारी म्हणाले की, जगभरात पसरलेल्या यूएस बायोलॉजी लॅबमधून गुप्त माहिती मिळाली आहे. या इनपुटच्या आधारे अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल अत्यंत कमकुवत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.
हा निष्कर्ष कोणत्याही भक्कम पायावर काढलेला नाही. व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल अनेक यूएस एजन्सींमध्ये अजूनही मतभेद आहेत. नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक एव्हरिल हेन्स यांनी अंतिम अहवाल सादर केला. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मधून सुरक्षेतील त्रुटींमुळे हा विषाणू लिक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांतच तो जगभर पसरला. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची गळती होण्याच्या अनेक सिद्धांत आहेत. येथे काम करणारे संशोधक विशेषतः कोरोना विषाणूच्या प्रजातींचा अभ्यास करतात.