नागपूर जिल्हा रामटेक

नगरधन येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन ९ फेब्रुवारीला

रामटेक ( प्रतिनिधी ):परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तसेच सेवक परिवार नगरधन व समस्त बाबांचे सेवक-सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व भव्य रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी नगरधन येथील नर्सरी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमात जवळपास ३० हजार सेवकांची उपस्थिती राहणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी ग्राम स्वच्छता अभियानाने होणार असून दुपारी जागृती भजन, तर सायंकाळी पायल गौतम म्युझिकल ग्रुप (मध्य प्रदेश) यांच्या परमात्मा एक ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी मानव धर्मावर आधारित भव्य रथयात्रा, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन करुन भव्य सेवक संमेलन होणार असुन यात चार तत्व, तीन शब्द, पाच नियम, सेवकांचे अनुभव, जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ‘व्यसनामुळे झाली संसाराची राख-रांगोळी’ हे तीन अंकी नाटक (वडसा प्रस्तुती) सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी बाळू शेळके (नागपूर) अध्यक्ष म्हणून लाभणार असून उद्घाटक म्हणून रामटेक पंचायत समितीचे सभापती नरेंद्र बंधाटे यांचेसह विविध मान्यवर तसेच शासकीय अधिकारी व परिसरातील पत्रकार बंधुची उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिन्ही मंडळाचे मार्गदर्शक श्रावण बावनकुळे, जगन जांभुळकर, हरिश्चंद्र बावनकुळे, तसेच तिन्ही मंडळाचे अध्यक्ष रमेश बिरणवार गुरुजी, उमेश गायधने, लक्ष्मण तरारे यासह परिसरातील मार्गदर्शक व अध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

सेवक संमेलनात सहभागी होणाऱ्या झाकींना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी गौरीशंकर माहुले, मनोज कुंभलकर, मोहित इखार, अनिल येळणे व अर्जुन बच्छोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *