हमलापुरी येथे मंडई, कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले
रामटेक ( प्रतिनिधी )मकर संक्रांतीनिमित्त हमलापुरी येथे तीन दिवसीय मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख आकर्षण कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र बंधाटे आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हमलापुरी गावात १५ ते १८ जानेवारीला रविवारी मंडई महोत्सवाची सांगता झाली.
दि.१५ जानेवारीला सकाळी ८ वाजता ग्राम स्वच्छता मोहिमेने या महोत्सवाची सुरुवात झाली.दुपारी कुस्ती स्पर्धा झाली. सायंकाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, कुस्तीगीर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा समावेश होता.माजी सभापती नरेंद्र बंधाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दि. १६ जानेवारी ला सकाळी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम झाला आणि दुपारी १ वाजता दांडपट्टा आखाड्याचे रोमांचक सादरीकरण सुरू झाले. रात्री ८ वाजता रंगारंग लावणी कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दि.१७ जानेवारीला सकाळी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि दुपारी नृत्य सादरीकरण झाले. विशेष म्हणजे रात्री ८ वाजता गुरुदेव नाट्य कला मंडळ, चिचाला यांनी सादर केलेल्या ‘अपना किसे कहे उर्फ आखरी फैसला’ या नऊ अंकी नाटकाचे सादरीकरण झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक अनिल वाघमारे यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज चौधरी, रितेश बिरनवार, सुरेंद्र बिरनवार, अजय मेहरकुले, हर्षपाल मेश्राम सह आदींचा माजी सभापती नरेंद्र बंधाटे यांनी सत्कार केला.
दि.१८ जानेवारीला रविवारी सकाळी खडा तमाशा आणि संध्याकाळी कोल्हापुरी लावणीच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप झाला. मंडई महोत्सव क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश बंधाटे यांनी केले.




