श्री क्षेत्र चौकी (वनग्राम), हिंगणा : पांडवकालीन बृहस्पती मंदिर, शनि शक्तिपीठ आणि यंत्रराज श्रीयंत्राचा दिव्य संगम
(डॉ. प्रवीण डबली) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र चौकी (वनग्राम) हे असे पावन तीर्थस्थान आहे, जिथे इतिहास, पुराणकथा, ज्योतिष, यंत्रशास्त्र आणि आध्यात्मिक साधना एकत्र सजीव झाल्याचे अनुभवास येते. येथे असलेले महाराष्ट्रातील एकमेव बृहस्पती मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पौराणिक मान्यतांमुळेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
पांडवकालीन बृहस्पती मंदिराची पौराणिक कथा
स्थानिक परंपरा, संतपरंपरा आणि जनश्रुतीनुसार या क्षेत्राचा इतिहास महाभारत काळाशी जोडलेला आहे. मान्यतेनुसार देवगुरु बृहस्पती हे पांडवांचे कुलगुरु होते. अज्ञातवासाच्या काळात पांडव विविध स्थळी भ्रमण करीत असताना, याच वनप्रदेशात त्यांनी गुरू बृहस्पतींची भेट घेऊन मार्गदर्शन प्राप्त केले, अशी श्रद्धा आहे.
अज्ञातवासादरम्यान पांडवांनी येथे गुप्तपणे गुरू बृहस्पतींची भेट घेतली आणि धर्म, कर्म व भवितव्याच्या दिशेबाबत उपदेश प्राप्त केला. गुरू बृहस्पतींनी या वनक्षेत्रात पांडवांना धैर्य, नीती आणि धर्माच्या मार्गावर अढळ राहण्याचा संदेश दिला. त्यामुळे हे स्थान गुरू-शिष्य परंपरेचे साक्षात प्रतीक मानले जाते.
पुराणांमध्ये बृहस्पतींना ज्ञान, न्याय, धर्म, नीती आणि गुरुतत्त्वाचा अधिष्ठाता ग्रह मानले गेले आहे. जिथे बृहस्पतींची साधना होते, तिथे अज्ञानाचा नाश होऊन विवेकाचा उदय होतो, अशी श्रद्धा आहे. याच विश्वासातून येथे बृहस्पती देवाचे मंदिर उभारले गेले, जे कालांतराने एक विशेष तीर्थक्षेत्र म्हणून प्रतिष्ठित झाले.
स्कंदपुराण आणि चक्रवर्ती नगरीची संकल्पना
या क्षेत्राचा विकास स्कंदपुराणकालीन प्राचीन चक्रवर्ती नगरीच्या संकल्पनेवर आधारित करण्यात आला आहे. संपूर्ण परिसराची रचना ब्रह्मांडीय संरचना आणि आध्यात्मिक चक्रांनुसार केली आहे. येथे ओंकारेश्वर ज्योतिष आखाड्याच्या माध्यमातून आध्यात्मिक, ज्योतिषीय व साधनात्मक उपक्रम राबविले जातात.
आचार्य भूपेश गाडगे यांच्या संकल्पनेतून येथे शनि शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली असून, त्यामुळे या क्षेत्राला एक पूर्ण शक्तिक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे अकरा लाख मंत्रजपाचा विश्वविक्रम (World Record) देखील प्रस्थापित झाला असून, या स्थानाच्या साधनात्मक ऊर्जेची साक्ष देतो.
शनी देव संपूर्ण यंत्रस्वरूपात
या क्षेत्राची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथे श्री शनी देव मूर्तीस्वरूपात नव्हे, तर संपूर्ण यंत्रस्वरूपात विराजमान आहेत. मंदिररचनेत बाह्य परिक्रमेपासून गर्भगृहापर्यंत चक्र, अष्टचक्र, षड्चक्र, चौकोन, चार गोपुरे आणि अखेरीस बिंदूपर्यंतची आध्यात्मिक यात्रा अनुभवता येते. ही यात्रा साधकाला बाह्य जगातून अंतर्मनाच्या दिशेने घेऊन जाते.
जगातील सर्वात मोठे श्रीयंत्र : यंत्रराजाची स्थापना
येथे स्थापन केलेले ३३०० किलो वजनाचे, चार फूट उंच व चार फूट रुंद दगडी श्रीयंत्र भारतातच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे श्रीयंत्र मानले जाते.
ब्रह्मांड पुराणानुसार श्रीयंत्राच्या गर्भात ३३ कोटी देवी-देवतांचे वास आहे. श्रीयंत्र हे श्री ललिता महात्रिपुरासुंदरी देवीचे निवासस्थान मानले जाते. येथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, परब्रह्म, परविष्णू आणि भगवान शिव यांचाही वास असल्याची श्रद्धा आहे.
श्रीयंत्रातील नऊ चक्रे मानवी देहातील नऊ आध्यात्मिक चक्रांचे प्रतीक मानली जातात. मध्यबिंदू, भूपूर व चार द्वार, षोडश कमळ, अष्ट कमळ आणि ४३ त्रिकोण यांचा समावेश असलेली ही रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळे श्रीयंत्राला सर्व यंत्रांमध्ये सर्वाधिक प्रभावी, शीघ्र फलदायी मानले जाते आणि म्हणूनच त्यास यंत्रराज असे संबोधले जाते.
इतर प्रमुख दर्शनीय स्थळे
या दिव्य क्षेत्रात श्रद्धाळूंना श्री शनी देव दर्शन, गर्भगृहातील छाया व ऋणमुक्तेश्वरी दर्शन, परिक्रमा पथ व नवग्रह कुंड, भारतातील सर्वप्रथम तिथी व नक्षत्र यंत्र, मध्य भारतातील अचूक वेळ दर्शविणारी सूर्यघडी तसेच सव्वा पंधरा फूट उंच भगवान विठ्ठलांची भव्य मूर्ती पाहण्याचा लाभ मिळतो.
श्रीयंत्र मंत्र
।। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ।।
श्री क्षेत्र चौकी (वनग्राम) हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, पांडवकालीन स्मृती, गुरू बृहस्पतींची कृपा, शनि साधना आणि यंत्रशास्त्राच्या पराकाष्ठेचे जिवंत केंद्र आहे. हे स्थान केवळ दर्शनापुरते मर्यादित न राहता, साधकाला आत्मिक अनुभव आणि अंतर्मुख प्रवासाची संधी देते. म्हणूनच हे क्षेत्र श्रद्धा, साधना आणि सिद्धी यांचा अद्भुत संगम बनले आहे.





