नवी दिल्ली, दि.०९। वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या पायाभूत रणनीतीसाठी समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे, सुनील बन्सल आणि तरुण चुग यांच्यावर केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांचे कार्यक्रम आणि ज्या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरचिटणीस विनोद तावडे, हे समितीचे निमंत्रक असणार आहेत. तर सुनील बन्सल आणि तरुण चुग हे या टीममध्ये काम करणार आहेत. तसेच अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत असतील. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यक्रम ही टीम निश्चित करणार आहे.
गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले तेथील उमेदवार ठरवणे, राजकीय रणनीती ठरवणे, संघटनात्मक कार्यक्रम राबवणे आणि मतदारांना पक्षाशी जोडण्याचे काम ही टीम करणार आहे. लोकसभा मतदारसंघानुसार मुद्यांची जुळवाजुळव करणे, वरिष्ठ नेत्यांच्या भाषणाचा मजकूर गोळा करणे आणि दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी यांच्यावर असणार आहे. तसेच ही टीम लवकरच आपले काम सुरू करणार आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदानंतर आता पुन्हा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा त्यांच्यावरील विेशास अधिक वाढल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.